Ajay Kandewar,Wani:- शहरात नमो उद्यानाच्या उद्घाटन फलकावरून वणीतील राजकारण अक्षरशः पेटलं आहे. फलकाची तोडफोड हा केवळ एक प्रकार नसून, त्यामागे दडलेली श्रेयवादाची घाणेरडी लढाई पुन्हा एकदा उघड झाली आहे. विशेष म्हणजे, विकासाच्या मुद्द्यांवर बोलण्याऐवजी माजी आणि विद्यमान आमदार पुन्हा एकदा “हे काम आमचं” म्हणत आमनेसामने उभे ठाकले आहेत. परिणामी, शहरातील राजकारणात आरोप-प्रत्यारोपांची धुरळाच उडाली आहे.
या वादाला आणखी धग देणारा मुद्दा म्हणजे जातीय राजकारणाची अचानक झालेली एन्ट्री. उद्घाटन फलकावर वणीच्या प्रथम नागरिक (आदिवासी महिला) यांचे नाव व माजी आमदाराचे नाव आणि फोटो असलेला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने तोडल्याचे दिसून आले आणि विशेष म्हणजे नवीन एक नमो उद्यान उद्घाटन फलक विद्यमान आमदार यांनी लावल्याने या घटनेला वेगळंच वळण देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. प्रश्न असा उभा राहतो की, विकासाच्या फलकावरून अचानक जातीचा मुद्दा नेमका कसा पुढे आला? काही राजकीय मंडळींकडून सहानुभूती मिळवण्यासाठी आणि स्वतःची बाजू मजबूत करण्यासाठी हा मुद्दा पुढे ढकलला गेला की काय असाही सवाल उपस्थित झाला आहे. परंतु विद्यमान आमदाराने असे का केले असेही काही सुशिक्षित वर्गाकडून बोलल्या जात आहे.
दरम्यान, नागरिक मात्र या सगळ्या प्रकाराकडे संतापाने पाहत आहेत. “फलक फोडून आणि जातीय मुद्दे उचलून नेमकं कोणाचं भलं होतं?” असा थेट सवाल जनतेतून विचारला जात आहे. विकासकामांपेक्षा श्रेयासाठी सुरू असलेली ही लढाई नागरिकांना केवळ भूलथाप देणारी ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे. प्रत्यक्षात उद्यान उभारलं, पण त्याचा फायदा किती आणि कोणाला, हा मुद्दा मागे पडला आहे.एकीकडे फलकाची तोडफोड, दुसरीकडे श्रेयासाठी सुरू असलेली चढाओढ आणि त्यात भर म्हणून जातीय रंग… हे सगळ न शोभणार राजकारण अशी चर्चा सुरू झाली आहे.या सगळ्यामुळे वणीचं राजकारण आणि आजी माजी आमदार यांचा IPL सुरू झाल्याचे म्हटल्या जात आहे.या वादातून खरंच विकासाचा मार्ग निघणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

