Ajay,Wani : पावसाळ्याची सुरुवात होताच तालुक्यातील राजूर गावातील स्वच्छता व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. गावात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा भरल्याने सांडपाणी रस्त्यावर येत आहे. विशेषतः वार्ड क्र.२,३,४,५ तसेच विहार परिसरात सर्वाधिक अस्वच्छता असल्याचे नागरिक सांगत आहेत. गावात प्रवेश करताच मुख्य रस्त्यावरील हायमास्ट बंद असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांना अंधारातून मार्ग काढावा लागत आहे.

विहार परिसर….
ग्रामस्थांचा आरोप आहे की, वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायतीकडून ठोस उपाययोजना होत नाही. प्रत्येक वेळी नागरिकांनाच निवेदन देण्याची वेळ येते, मात्र त्यानंतरही परिस्थितीत फारसा बदल दिसत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. “गावात कचरा आहे, नाले तुंबले आहेत, दिवे बंद आहेत, हे सचिवांना वेगळे सांगावे लागते का?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
पावसाळ्यात साथीच्या आजारांचा धोका वाढत असताना स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि नाल्यांची साफसफाई तातडीने होणे आवश्यक आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाने त्वरित परिस्थितीची दखल घेऊन प्रभावी उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, या आरोपांबाबत ग्रामपंचायत सचिवांची बाजू अद्याप समोर आलेली नाही. त्यांच्या प्रतिक्रिया मिळाल्यानंतर त्या प्रसिद्ध केल्या जातील.
ग्रामपंचायत प्रशासक व सचिवांचा बहुतांश वेळ कार्यालयात बसून केवळ कागदपत्रांची पूर्तता करण्यातच जात असावा म्हणून गावातील स्वच्छता, तुंबलेले नाले, बंद पथदिवे आणि इतर मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होत असावे. मात्र गाव सचिव आल्यापासून “हुंगूनही”पाहत नसल्याची बिकट परिस्थिती आहे. नाल्यांची स्वच्छता देखील “थातूरमातूर” पद्धतीने करण्यात येत असल्याचा आरोपही गावकरी करत आहे.

