Ajay Kandewar,Wani:-शासनाच्या प्रोटोकॉलचा भंग झाल्याने आमदार संजय देरकर यांचा संताप उद्घाटन सोहळ्यात उफाळून आला. “ईट का जवाब पत्थर से देंगे” या थेट आणि आक्रमक शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना इशारा देत पुढील काळात अशा प्रकारची “थट्टा” अजिबात सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. नमो उद्यानाच्या उद्घाटनावेळी त्यांनी आपला प्रहारक पवित्रा दाखवत प्रशासनालाच जणू धारेवर धरले.
उद्घाटनाचा कार्यक्रम हा शासनाने ठरवलेल्या प्रोटोकॉलनुसारच व्हायला हवा, असा नियम असताना त्यात त्रुटी दिसून आल्याने देरकर चांगलेच भडकले. “शासनाने दिलेला प्रोटोकॉल हा केवळ कागदावर ठेवण्यासाठी नाही. तो पाळला गेला नाही, तर येणाऱ्या अधिकाऱ्यांनी आता यापुढे परिणामांची तयारी ठेवावी,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची सेना अशी थट्टा कधीच सहन करणार नाही, असे सांगत त्यांनी आपली भूमिका अधिक ठाम केली.
या घटनेमुळे वणी शहरातील सेना – प्रशासन वातावरण चांगलेच तापले असून, पुढील काळात कोणताही कार्यक्रम प्रोटोकॉलशिवाय होऊ नये, यासाठी दबाव वाढण्याची शक्यता आहे. आमदार देरकरांचा हा आक्रमक आणि रागीट पवित्रा पाहता प्रशासनालाही आता अधिक सतर्क राहावे लागणार आहे.

