Ajay Kandewar,Wani:- वणी शहरातील नमो उद्यानाच्या निमित्ताने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले असून, प्रोटोकॉलच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि नगरपरिषद प्रशासन यांच्यात थेट संघर्ष उभा ठाकला आहे. विविध शासकीय कार्यक्रमांमध्ये लोकप्रतिनिधींना अपेक्षित सन्मान दिला जात नसल्याचा गंभीर आरोप करत काँग्रेसने एका निवेदनातून प्रशासनावर निशाणा साधला. शासनाच्या परिपत्रकाचे उल्लंघन होत असल्याचा दावा करत त्यांनी वणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्यावर राजकीय समन्वय न साधण्याचा आणि शहरात जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्याचा आरोप केला.
मात्र, या आरोपांना वणी नगरपरिषद मुख्याधिकारी सचिन गाडे यांनी ठामपणे फेटाळून लावत कायदेशीर बाजू स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, अद्यापही शासनाचा कोणताही अधिकृत शासकीय भूमिपूजन कार्यक्रम पार पडलेला नाही, त्यामुळे प्रोटोकॉल लागू होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. संबंधित कार्यक्रम हे केवळ पक्षीय स्तरावर झाले असून, अशा कार्यक्रमांमध्ये प्रशासनाचा सहभाग नसतो, हे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे स्वतःसह कोणताही कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
प्रोटोकॉल हा फक्त शासकीय कार्यक्रमांनाच लागू होतो, हा प्रशासनाचा स्पष्ट युक्तिवाद आहे. म्हणजेच, जर कार्यक्रम शासनाच्या नावाने अधिकृतरित्या जाहीर व आयोजित नसेल, तर प्रोटोकॉलचे नियम लागू होत नाहीत. त्यामुळे काँग्रेसने उपस्थित केलेला मुद्दा कायदेशीरदृष्ट्या कमकुवत ठरू शकतो, असा संकेत प्रशासनाच्या भूमिकेतून दिसून येतो.त्याचवेळी, मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की,भविष्यात जेव्हा अधिकृत शासकीय कार्यक्रम होईल, तेव्हा शासनाच्या परिपत्रकानुसार प्रोटोकॉल काटेकोरपणे पाळला जाईल. त्यांनी काँग्रेसच्या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देत थेट चर्चेद्वारे संवाद साधल्याचेही सांगितले, ज्यातून प्रशासनाने तणाव कमी करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.
‘नमो उद्यान’ की ‘नाव कमावण्याच राजकीय स्टंट’ प्रयत्न?
नमो उद्यानाच्या नावाखाली अचानक सक्रिय झालेल्या राजकीय हालचालींकडे नागरिकही संशयाने पाहू लागले आहेत. विकासाच्या कामांपेक्षा फोटो, फलक आणि श्रेय घेण्याची चढाओढ अधिक दिसत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. “लोकप्रतिनिधींचा सन्मान” हा मुद्दा पुढे करून प्रत्यक्षात राजकीय उपस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला जात असल्याच ओरड सुरू आहे. विशेष म्हणजे हा चमकोगिरी चा प्रकार असल्याचं संशय सुद्धा नागरिकांतून बोलल्या जात आहे.

