अजय कंडेवार,वणी:- मागील दोन ते तीन दिवसांपासून उकाडा सहन करणाऱ्या वणीकरांना सोमवारी काहीसा दिलासा मिळाला. सोमवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. विजेच्या कडकडाट अन् वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने वणीत दमदार हजेरी लावली. दरम्यान, शनिवार ,रविवार व सोमवारी सकाळपासूनच अति उकाडा जाणवत होता. पावसाची शक्यता वर्तविण्यातही येत होती.Heavy rain in Wani with lightning and gale.
दुपारनंतर अचानक परिसरात वातावरणात बदल झाला. आभाळात ढग दाटून आले होते. शहरी भागात पावसाला सुरूवात झाली. पाच वाजल्यापासून शहरात वादळी वारे जोरात सुटले. लगेचच पावसाने जोरदार हजेरी लावली. साधारण: अर्धा तास जोरदार पाऊस बरसत होता. त्यानंतर रिमझिम रिमझिम सुरुच राहिला.
भूर्की गावात गारपीट……..
शहरी भागात विवाह सोहळ्यांसाठी मंगल कार्यालय, हॉल आदींची व्यवस्था असते. परंतु, ग्रामीण भागात मात्र मोकळ्या जागेत किंवा गावाशेजारील शेतामध्ये विवाह सोहळा होतो. परंतु, अवकाळी पाऊस अधून-मधून हजेरी लावत असल्याने वऱ्हाडी मंडळींची फजिती होत आहे.
भारतीय हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा…..
“भारतीय हवामान विभाग (IMD)नागपूर यांनी येत्या ३ तासात गडचिरोली, यवतमाळ येथे काही ठिकाणी विजांचा कडकडाट, गारपीट, वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन हवामान खात्याचा विभागाकडून करण्यात आले.”