अजय कंडेवार,वणी:– विवाहादि संस्कार आवश्यका असे राष्ट्रसंत म्हणतात. त्यामुळे लग्न प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील आनंदाचा अति आनंदाच प्रसंग. वणी तालुक्यात गणेशपुर या गावी एका नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी लग्नापेक्षाही राष्ट्रीय कर्तव्याला महत्त्व दिले. चंद्रपूर लोकसभेसाठी मतदान होत असताना या नवरदेवाने मतदानाचं कर्तव्य बजावलं. एकीकडे लगीनघाई असताना या नवरदेवाने मतदान केंद्रावर जाऊन बोटावर शाई लावून घेत मतदानाचा हक्क बजावला.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासह राज्य व देशातील काही मतदारसंघात १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदानाला सकाळी ७ वाजता सुरुवात झाली. प्रामुख्याने चंद्रपूर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार व महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकरांसह तब्बल १५ उमेदवार रिंगणात आहेत.
त्यातच वणी विधानसभेतील गणेशपूर गावातील एका तरुण मतदाराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अंगात शेरवानी, डोक्यावर पगडी अशा वेशातील एक तरुण गणेशपुर मतदान केंद्रावर आला .आणि सर्वांच्या नजरा त्याच्याकडेच वळल्या. गौरव दादाजी लेडांगे रा.गणेशपूर, ता.वणी.जिल्हा यवतमाळ असे त्या तरुणाचे नाव असून लग्न मंडपात जाण्यापूर्वी तो मतदान केंद्रावर त्याचा परिवारासह आला, अन् तेथे त्याने मतदानाचा हक बजावला. लोकशाहीसाठी योग्य लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी आपण मतदान केलं असं गौरव लेडांगेने व त्यांचे मोठे बंधू प्रवीण नांदे यांनी आवर्जून सांगितले.