Ajay Kandewar,Wani : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य कोणत्याही एका जातीपुरते मर्यादित नसून संपूर्ण समाजाच्या उन्नतीसाठी होते, असे प्रतिपादन वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश पी.एस. जोंधळे यांनी केले. वणी वकील संघातर्फे आयोजित जयंती कार्यक्रमात अध्यक्षीय भाषण करताना त्यांनी सांगितले की, या महामानवांचा लढा सामाजिक विषमतेविरुद्ध होता. आजच्या काळात त्यांच्या विचारांना जात-धर्माच्या चौकटीत बांधण्याचा प्रयत्न होत असल्याने त्याला प्रतिकूल प्रवृत्ती मानावे लागेल. त्यामुळे त्यांच्या विचारांचे अनुकरण करून आचरणात आणणे हेच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) वणी येथील बार रूममध्ये झालेल्या या कार्यक्रमाला सह न्यायाधीश भोसले, सह न्यायाधीश बिरादर, वकील संघाचे अध्यक्ष ऍड. वीरेंद्र महाजन, ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. वसंतराव कवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी ऍड. वीरेंद्र महाजन, ऍड. वसंतराव कवाडे, ऍड. रेखा तेलंग आणि ऍड. अमोल टोंगे यांनीही आपल्या मनोगतातून विचार मांडले.
कार्यक्रमात अटर्नी हितेश मजगवडी यांनी भीमगीत सादर करून वातावरण भारावून टाकले. तसेच ऍड. वीरेंद्र महाजन यांनी डॉ. आंबेडकर व महात्मा फुले यांच्या जीवनावरील साहित्य वकील संघाच्या ग्रंथालयासाठी उपलब्ध करून देण्याची इच्छा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. अमोल टोंगे यांनी केले. यावेळी ऍड. दिलीप परचाके, ऍड. यशवंत बर्डे, ऍड. विप्लव तेलतुंबडे, ऍड. मिलिंद निमजे, ऍड. रामेश्वर लोणारे, ऍड. निलेश चौधरी, ऍड. राहुल दानव, ऍड. चंदू भगत, ऍड. जुगलकिशोर तुगनायत आदी वकील उपस्थित होते.

