वणी:- शहरातील कोलमडलेली वाहतूक व्यवस्था आणि त्यास जबाबदार असणाऱ्या वाहतूक पोलीस शाखेच्या निष्क्रियतेमुळे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसे वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांनी दिलेल्या या निवेदनात, वाहतूक शाखेला तात्काळ बरखास्त करून सरकारी तिजोरीची लूट थांबवण्याची मागणी केली आहे, अन्यथा मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
मनसेच्या निवेदनानुसार, वणी शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली आहे. सणासुदीच्या दिवसांत बाजारपेठेत गर्दी वाढत असताना, वाहतूक पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचे नियंत्रण ठेवले जात नाही. अवैध प्रवासी वाहतूक करणारे ऑटो सर्रासपणे वाहतुकीला अडथळा निर्माण करत आहेत. महाविद्यालयीन तरुण भरधाव वेगाने दुचाकी चालवून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत आणि दिवसाढवळ्या अवजड वाहने शहराच्या रस्त्यांवरून फिरत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे.
•मनसेने आरोप…
मनसेने थेट आरोप केला आहे की, या सर्व अराजकतेवर नियंत्रण ठेवण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेली वाहतूक पोलीस शाखा हे केवळ शोभेचे केंद्र बनले आहे. या शाखेवर लाखो रुपये खर्च होत असतानाही, त्यांचे कर्मचारी दगडी कोळसा, डोलामाईड आणि इतर गौण खनिजांच्या वाहतुकीतून वसुली करण्यात व्यस्त आहेत
•‘सरकारी पैशांची उधळपट्टी थांबवा’
इरशाद खान यांनी निवेदनात म्हटले आहे की, ज्या कार्यालयाची कार्यक्षमता शून्य आहे, ते केवळ सरकारी पैशांची लूट करत आहे. जनतेच्या कराच्या पैशांची अशी उधळपट्टी तात्काळ थांबायला हवी. वणीतील वाहतूक पोलीस शाखा बंद करून पोलिसांचा अनावश्यक खर्च वाचवावा, अशी मागणी मनसेने केली आहे.

