अजय कंडेवार,वणी : तालुक्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन पिक कीड व रोगांच्या प्रादुर्भावाने उध्वस्त झालेले पाहून वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांनी लाखापूर,वानोजादेवी, वेगाव, पिसगाव, चिचाळा व पाथरी या गावांना भेटी देत प्रत्यक्ष शेतात येऊन पिकांची पाहणी केली. अख्या चिखलात शेतकऱ्यांचा वेदना जाणून घेत आमदार जवळपास १ कि.मी पायी चालत आढावा घेतला. या पाहणी दौर्यात कृषी विभागाचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते.

वणी विधानसभेत सुरुवातीला उशिरा पाऊस झाल्याने पेरण्या उशिरा झाल्या. नंतर पावसाने उघडीप दिल्याने काही पेरण्या रखडल्या. जुलै अखेरीस मध्यम स्वरूपात पाऊस झाला. त्यावर पेरण्या पूर्ण झाल्या. शेतकऱ्यांनी मेहनतीने पिके उभी केली. मात्र, श्रावणात संततधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. गणेशोत्सवाच्या काळात पुन्हा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढला. कपाशीवर लाल्या रोगाचा प्रकोप झाला. झाडे लाल पडली, काही झाडे सुकून गेली. उत्पन्नावर मोठा परिणाम झाला. शेतकऱ्यांच्या हाती अत्यल्प उत्पादन येणार आहे. “हातातोंडाशी आलेला घास हिरावला. कपाशीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळं आमदार देरकर यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत कीडनाशक फवारणी, रोगप्रतिबंधक उपाय व शासनाकडून दिलासा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. “शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तडजोड नाही; शासनदरबारी तातडीने पाठपुरावा करणार,” असे त्यांनी स्पष्ट केले.
•शेतकऱ्यांच्या वेदना
सोयाबीनवर कीड व रोगामुळे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. “दिवसेंदिवस शेती खर्च वाढतोय, पण उत्पादन घटतेय. आमदार साहेब आले म्हणून किमान आमचा आवाज वरपर्यंत पोहोचेल,” अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
•अधिकाऱ्यांची जबाबदारी…
पाहणीदरम्यान कृषी अधिकाऱ्यांनी पिकांवर परिणाम करणाऱ्या कीड व रोगांची माहिती दिली आणि योग्य उपाययोजनांची रूपरेषा मांडली. मात्र या उपायांचा फायदा वेळेत व योग्य पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे,जनतेचे लोकप्रिय आमदार संजय देरकर यांनी शेतात उतरण्याचा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.

