Ajay,Wani:- वाहतूक कोंडीबाबत निवेदनाचा पाऊस झाला, तक्रारी झाल्या,वाहतूक कोंडीवर चर्चा पण झाली मात्र वणीच्या मुख्य बाजारपेठेतील बेशिस्तीचे चित्र काही बदलत नव्हते. अखेर वणी वाहतूक शाखेचे नवनियुक्त प्रमुख पोलीस निरीक्षक नरेश रणधीर स्वतः व त्यांची टीम ‘ॲक्शन मोड’वर आले आणि थेट रस्त्यावर उतरले आहे.कमान चौकापासून गांधी चौकापर्यंतच्या वर्दळीच्या बाजारपेठेत प्रत्यक्ष फिरून त्यांनी रस्त्यावर आलेले दुकानांचे साहित्य हटविण्याच्या सूचना दिल्यात ,अस्ताव्यस्त उभ्या वाहनांना शिस्त लावली आणि व्यापाऱ्यांना स्पष्ट शब्दांत तंबी दिली शिस्तीत व्यवसाय करा, वाहतुकीला अडथळा निर्माण करू नका अन्यथा कारवाईला होईलच.
वणीच्या मुख्य बाजारपेठेत रस्त्यापर्यंत दुकानांचे साहित्य मांडणे आणि अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होण्याच्या तक्रारी सातत्याने होत होत्या. या प्रश्नावर विविध संघटना आणि राजकीय पक्षांकडून निवेदनेही देण्यात आली. मात्र आता वाहतूक शाखा प्रमुख PI नरेश रणधीर यांनी केवळ कागदी सूचनांवर न थांबता थेट ‘ग्राउंड झिरो’वर उतरून कारवाईचा इशारा दिला आहे. बाजारपेठेत प्रत्यक्ष फिरत त्यांनी व्यापाऱ्यांना रस्त्यावरील अडथळे दूर करण्यास सांगितले आणि वाहनधारकांनाही पार्किंगची शिस्त पाळण्याच्या सूचना दिल्या.रस्ता हा सर्वसामान्य नागरिकांच्या वाहतुकीसाठी आहे. व्यवसाय करा, पण शिस्तीत करा. दुकानांचे साहित्य रस्त्यावर आणून किंवा बेशिस्त पार्किंग करून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्यास यापुढे कारवाई केली जाईल, अस स्पष्ट P.I रणधीर यांनी आपल्या कृतीतून दिला.
‘शिस्तीचा ‘रणधीर पॅटर्न’ चालणार….
नव्याने पदभार स्वीकारल्यानंतर PI नरेश रणधीर यांनी सुरुवातीलाच शहराच्या सर्वाधिक ज्वलंत वाहतूक समस्येला हात घातल्याने वणीकरांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. कमान चौक ते गांधी चौक सुरू झालेला हा ‘शिस्तीचा रणधीर पॅटर्न’ संपूर्ण शहरात राबविला जाणार आहे .बेशिस्त पार्किंग आणि रस्त्यावरील अडथळ्यांवर सातत्याने कारवाई होणार याबद्दल स्पष्ट मत PI नरेश रणधीर यांनी दिले.

