Ajay Kandewar,Wani:- महिलांसाठी आव्हानात्मक ठरत असलेल्या आजच्या या काळात महिलांनी शारिरिक दृष्ट्या सक्षम रहावे आणि येणाऱ्या कठीण प्रसंगाला तोंड देण्यासाठी तयार व्हावे या उद्देशातून जिल्हा पोलिस दलाच्या ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत दोन दिवसीय महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरादरम्यान मुली, महिला यांना आत्मसंरक्षणाचे धडे (सायबर क्राईम, महिला विषयी कायदे, मोटिवेशन, करियर गायडन्स ,कराटे ) बाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहेत.

सर्वसामान्य नागरिक आणि पोलिस प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद वाढावा यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या कल्पनेतून आणि अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पोलिस दलाने ऑपरेशन प्रस्थान राबवण्यास सुरूवात केली आहे. या ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यामध्ये सध्या वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना आणि एकट्या महिलांसाठी अनेकदा आव्हान ठरणारा सध्याचा काळ पाहता महिलांनी शारीरिकदृष्ट्या सक्षम बनावे आणि येणाऱ्या प्रसंगाशी दोन हात करण्यासाठी तयार रहावे या उद्देशाने दोन दिवसीय महिला सुरक्षा व सक्षमीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. (दि.१४ में ते १६ में) रोजी आयोजित शिबिरामध्ये १५ ते ३० वर्षे वयोगटातील महिलांना सहभागी होता येणार आहे. त्यासाठी वणी पोलिस ठाण्यात जावुन (दि.९ में व १० में ) या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळात अर्ज भरता येणार आहे. शिबिरामध्ये सकाळ आणि सायंकाळ दोन वेळामध्ये यवतमाळ पोलिस कवायत मैदानावर आत्मसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर दुपारी पोलिस मुख्यालयातील सभागृहात महिला सक्षमिकरण, आरोग्य व शैक्षणिक विषयक प्रशिक्षण कार्यशाळेचे निवासी अयोजन करण्यात आले आहे.
•शिबीरार्थीच्या भोजन, निवासाची व्यवस्था.
शिबीरार्थीच्या भोजन, निवासाची व्यवस्था जिल्हा पोलिस दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय निवासी शिबीरामध्ये सहभागी होण्यासाठी येणाऱ्या महिलांच्या निवासाची आणि भोजनाची मोफत व्यवस्था जिल्हा पोलिस दलाच्या वतीने करण्यात येणार आहे. पोलिस कवायत मैदानावर आत्मसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी प्रत्येक शिबीरार्थींना पुर्वी दिलेल्या पोलिस ठाण्यात जावून अर्ज करणे अनिवार्य राहणार आहे.
•जिल्ह्यात प्रथमच उपक्रम….
महिला व मुलींसाठी आत्मसंरक्षणाचे धडे देणारे निवासी शिबिर पहिल्यांदाच आयोजित केले जात आहे. ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत जिल्हा पोलिसांकडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. या अंतर्गतच हे निवासी शिबिर होत आहे. त्यासाठी दर्जेदार प्रशिक्षक राहणार आहेत.

