Friday, October 23, 2026
HomeBreaking"त्या लुटारू "...मुजोर ट्रॅव्हल्स चालकांचे व मालकांचे परवाने तात्काळ रद्द करा....

“त्या लुटारू “…मुजोर ट्रॅव्हल्स चालकांचे व मालकांचे परवाने तात्काळ रद्द करा….

Ajay, Wani वणी:- दिवाळी सणाच्या तोंडावर मुंबई, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरहून यवतमाळ व वणीकडे येणाऱ्या चाकरमानी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवाशांची खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून सुरू असलेली आर्थिक लूट तातडीने थांबवावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO), यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले आहे. मनसेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांनी या प्रकरणात प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कठोर दंडात्मक कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

दिवाळीत कुटुंबीयांकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत खाजगी ट्रॅव्हल्स चालकांनी मनमानी सुरू केली असून, सामान्य दिवसांत ८०० ते १००० रुपयांच्या आसपास असणारे प्रवासाचे तिकीट सध्या कोणतीही पूर्वकल्पना किंवा शासकीय नियमांचे पालन न करता तब्बल २५०० ते ३५०० रुपये किंवा त्याहून अधिक वसूल केले जात आहे. शासकीय परवान्यातील अटी धाब्यावर बसवून सुरू असलेल्या या सर्रास लुटीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. ही पिळवणूक थांबवण्यासाठी यवतमाळ आणि वणी परिसरात त्वरित विशेष ‘वायुवेगा पथक’ (Flying Squad) तैनात करावे, मुंबई-पुण्याकडून येणाऱ्या-जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसस्थानक व बुकिंग कार्यालयांवर अचानक छापे टाकून जादा दर आकारणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, प्रत्येक बसवर आणि बुकिंग काऊंटरवर शासनामान्य दरपत्रक ठळकपणे दर्शवणे सक्तीचे करावे आणि नियमभंग करून प्रवाशांची लूट करणाऱ्या मुजोर ट्रॅव्हल्स चालकांचे व मालकांचे परवाने तात्काळ रद्द करण्यात यावेत, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. जर या प्रकरणात प्रादेशिक परिवहन विभागाने दिरंगाई केली आणि प्रवाशांच्या लुटीकडे दुर्लक्ष केले, तर मनसेतर्फे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरून हा प्रकार उघडकीस आणतील आणि खाजगी ट्रॅव्हल्सची मनमानी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. ऐन दिवाळीत प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्यासाठी प्रशासनाने या पत्राची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, ज्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page