Ajay Kandewar,Wani:- वणी शहरात लॉज प्रकरण आता अधिकच गंभीर बनत चालले असून “ओळखपत्र एडिटिंग” आणि संशयास्पद एन्ट्रीचा प्रकार बेधडक सुरू असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. विशेष म्हणजे, खाती चौक परिसरातील काही लॉज तसेच इतर भागांमध्येही हा प्रकार सुरू असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिकांमध्ये कुजबुज इतकी वाढली आहे की, “ओळख बदला आणि एन्ट्री घ्या” हा जणू एक गुप्त फॉर्म्युलाच बनल्याचे चित्र समोर येत आहे.
या प्रकरणात सर्वात गंभीर बाब म्हणजे प्रशासनाचा कथित निष्क्रियपणा. इतक्या मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असतानाही अद्याप एकाही लॉजवर ठोस चौकशी किंवा कारवाई झाल्याचे चित्र दिसत नाही. प्रत्येक लॉजची तपासणी का होत नाही? संशयित ठिकाणांवर छापे का पडत नाहीत? असे थेट प्रश्न नागरिकांकडून विचारले जात आहेत. काही जण तर उघडपणे असा आरोप करत आहेत की, “हा प्रकार इतका वाढू दिला गेला, तर त्यामागे प्रशासनाचीच भूमिका संशयास्पद ठरते.
दरम्यान, या सगळ्या प्रकारामुळे शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. “गुपचूप सुरू असलेले व्यवहार” आणि “खिलाडी स्टाईल गुप्त हालचाली” यामुळे भावी पिढी धोक्यात जात असल्याची भीती व्यक्त होत आहे. जर तातडीने कठोर कारवाई झाली नाही, तर हा प्रकार आणखी खोलवर रुजण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता प्रशासनाने मौन तोडून स्पष्ट भूमिका घ्यावी आणि संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

