Tuesday, July 21, 2026
HomeBreakingचंद्रपूर–नकोडा–साखरा–शिंदोला–मुकुटबन बससेवा लवकरच पुन्हा सुरू होणार.......

चंद्रपूर–नकोडा–साखरा–शिंदोला–मुकुटबन बससेवा लवकरच पुन्हा सुरू होणार…….

Ajay,Wani : सन २०२३ मध्ये वर्धा नदीवरील मुंगोली पूल नादुरुस्त झाल्यामुळे बंद पडलेली चंद्रपूर– नकोडा– साखरा–शिंदोला–मौहदा–कृष्णापूर–मुकुटबन ही एसटी बससेवा आता तब्बल तीन वर्षांनंतर पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. पूलाचे काम पूर्ण होऊन त्यावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू झाल्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी या मार्गावरील बससेवा सुरू करण्यासाठी  सुधीर मुनगंटीवार तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, चंद्रपूर विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. या बससेवेमुळे विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर, कामगार, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून यवतमाळ व चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यांतील दळणवळणालाही चालना मिळणार आहे.

१३ जुलै २०२६ रोजी परिवहन विभागाने या मार्गाचा पहिला सर्व्हे केला असता नकोडा गावाजवळ रस्त्यातील बॅरिअरमुळे एसटीला पुढे जाता आले नाही. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते किरण बांदुरकर यांच्या पुढाकाराने आणि संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून १५ जुलै रोजी हा अडथळा हटविण्यात आला. १६ जुलै रोजी पुन्हा सर्व्हे करण्यात आला. मात्र, कोळगाव चेकपोस्ट ते शिंदोला शेवाळा टेकडीदरम्यानचा रस्ता खराब असल्याने बससेवा तत्काळ सुरू करणे शक्य नसल्याचे परिवहन विभागाचे अधिकारी ध्रुवदास मडावी यांनी स्पष्ट केले. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित कंत्राटदार बाजोरिया यांना रस्ता तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर अंतिम सर्व्हे करून चंद्रपूर–नकोडा–साखरा–शिंदोला–मुकुटबन ही बससेवा पुन्हा नागरिकांच्या सेवेत दाखल करण्यात येणार असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी दिली. गेली तीन वर्षे या मार्गावरील बससेवा सुरू करण्यासाठी त्यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, प्रशासनाने त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page