Wednesday, November 4, 2026
HomeBreakingअमृत योजनेच्या कंत्राटदारांना बिल देण्यापूर्वी कामे पूर्ण करा....

अमृत योजनेच्या कंत्राटदारांना बिल देण्यापूर्वी कामे पूर्ण करा….

Ajay,Wani:- शहरात अमृत योजनेंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांचा बोजवारा उडाला असून, कंत्राटदारांच्या मनमानी आणि निकृष्ट कामांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक प्रभागांमध्ये रस्ते खोदून ठेवण्यात आले असून, तीन ते चार महिने उलटूनही रस्त्यांची पूर्ववत दुरुस्ती झालेली नाही. त्यातच पाइपलाइनमधील लिकेज दुरुस्तीसाठी आठवडाभराचा कालावधी लागत असल्याने पाणीपुरवठ्याच्या समस्यांनाही नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत नगरसेवक तथा नियोजन समिती सभापती लक्ष्मण उरकुडे यांनी आक्रमक भूमिका घेत ३ नोव्हेंबर रोजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना लेखी निवेदन देत प्रशासनाला जाब विचारला आहे.

अमृत योजनेच्या नावाखाली नागरिकांच्या पैशातून विकासकामे होत असताना नागरिकांच्याच वाट्याला गैरसोय का, असा सवाल उरकुडे यांनी उपस्थित केला आहे. संबंधित प्रभागांतील अपूर्ण कामे पूर्ण केल्याशिवाय कंत्राटदारांची बिले अदा करू नयेत, खोदलेले रस्ते तातडीने पूर्ववत करावेत, पाइपलाइनमधील सर्व लिकेज दुरुस्त करून सुरळीत पाणीपुरवठा करावा, तसेच नगरसेवक व नागरिकांच्या तक्रारींची प्रत्यक्ष स्थळपाहणी करून दखल घ्यावी, अशा सहा ठोस मागण्या त्यांनी निवेदनातून केल्या आहेत. कामाच्या गुणवत्तेची करारातील अटींनुसार तपासणी करूनच देयके मंजूर करावीत आणि दिरंगाई व निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदारांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी, अशीही त्यांची मागणी आहे. त्यामुळे आता नगरपरिषद प्रशासन या निवेदनाची कितपत गांभीर्याने दखल घेते, याकडे वणीकरांचे लक्ष लागले आहे.

नियोजन समिती सभापती लक्ष्मण उरकुडे यांची ठाम भूमिका……..

नागरिकांच्या पैशातून विकासकामे होत असताना त्याच नागरिकांना त्रास सहन करावा लागणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. नगरसेवक म्हणून नागरिकांच्या तक्रारी आणि अडचणी आम्हाला प्रत्यक्ष अनुभवायला मिळतात. जोपर्यंत अपूर्ण कामे पूर्ण होत नाहीत, नागरिकांच्या समस्या मार्गी लागत नाहीत आणि कामाबाबत समाधानकारक खात्री होत नाही, तोपर्यंत संबंधित कंत्राटदारांची बिले अदा करू नयेत. नागरिकांच्या हिताशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही अशी ठाम भूमिका नगरसेवक तथा नियोजन समिती सभापती लक्ष्मण उरकुडे यांनी मांडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page