Ajay,Wani:- लालपुलिया येथील कोळसा प्लॉट हटविण्यासाठी संघर्ष समितीने पुकारलेल्या आंदोलनाचा गोंधळ आता गावाच्या वेशीबाहेरही पोहोचल्याचे चित्र आहे. सुरुवातीला २७ तारखेची आंदोलनाची घोषणा, त्यानंतर २ नोव्हेंबरची नवी तारीख आणि अखेर ५ नोव्हेंबर रोजी आंदोलनाची हाक, अशा बदलत्या तारखांमुळे आधीच संभ्रमाचे वातावरण असताना राजूर गावाकडे जाताना दिसणारा संघर्ष समितीचा फलक मात्र अजूनही २७ तारखेच्या आंदोलनाचीच दिशा दाखवत आहे. त्यामुळे राजूर परिसरातील नागरिकांमध्येही प्रश्न निर्माण झाला आहे की, २७ तारखेचे आंदोलन झाले की अजून होणार आहे? आंदोलनाची तारीख बदलली, नियोजन बदलले; मग रस्त्यालगतचा फलक बदलण्याची जबाबदारी कोणाची? आंदोलनाच्या प्रचारासाठी लावलेला फलकच जर जुन्या तारखेची माहिती देत असेल, तर नागरिकांनी नेमका कोणत्या घोषणेवर विश्वास ठेवायचा?
विशेष म्हणजे, आंदोलनाच्या तारखा वारंवार बदलण्यामागील नेमकी कारणे काय, याबाबतही स्पष्टता दिसत नाही. एका तारखेची घोषणा, त्यानंतर दुसऱ्या तारखेची तयारी आणि आता तिसऱ्या तारखेला आंदोलन, या साऱ्या घडामोडींमध्ये नियोजनाचा अभाव आहे की अंतर्गत समन्वयाचा प्रश्न, असा या लावलेल्या बोर्डामुळे सवाल उपस्थित होत आहे. दुसरीकडे पंकज मोरे यांच्या गटाने स्वतंत्रपणे प्रशासकीय पाठपुरावा सुरू ठेवल्याने संघर्षाच्या दोन प्रवाहांमधील अंतरही चर्चेत आहे. कोळसा प्लॉट हटविण्याचा प्रश्न गंभीर असताना आंदोलनाच्या तारखांचाच घोळ निर्माण होणे, ही संघर्ष समितीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी बाब ठरत आहे. आता तरी जुन्या तारखेचे फलक बदलून नागरिकांना अधिकृत आणि स्पष्ट माहिती देण्याची जबाबदारी समितीने घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.२७ तारखेचा फलक अजूनही रस्त्यावर उभा आहे आणि आंदोलनाची तारीख मात्र पुढे सरकली आहे. मग नागरिकांनी फलक वाचायचा की समितीची नवी घोषणा ऐकायची?हा संभ्रम दूर करावा अशी जनतेतून अपेक्षा व्यक्त होत आहे.

