Ajay Kandewar,Wani:- माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी विद्यमान आमदार संजय देरकर यांना दिलेल्या उघड चॅलेंजनंतर वणीचे राजकारण चांगलेच तापले आहे. दीड वर्षाच्या कार्यकाळात विकासाच्या नावावर केवळ घोषणा झाल्या, प्रत्यक्षात ठोस कामांचा अभाव, दिड वर्षापासून विकास काम शून्य आणि वारंवार श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा घनाघाती आरोप करत माजी आमदार संजीवरेड्डी यांनी विद्यमान आमदारांना जनतेसमोर खुल्या डिबेटसाठी आव्हान दिले आहे. या थेट सवालामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून आरोपांची धार अधिक तीव्र झाली आहे.
विशेष म्हणजे, इतक्या गंभीर आरोपांनंतरही विद्यमान आमदार संजय देरकर यांची कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे “चॅलेंज स्वीकारणार का?” हा प्रश्न आता जनतेच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. जर विकास खरोखरच झाला असेल, तर तो कागदपत्रांसह जनतेसमोर मांडण्याची तयारी दाखवली जाईल का, की मौन राखत वेळ काढण्याचीच भूमिका घेतली जाईल, असा टोला विरोधकांकडून लगावला जात आहे.
दरम्यान, वणीतील नागरिकांमध्येही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. खुली डिबेट घेऊन विकासाचा हिशोब थेट जनतेसमोर दिला जाणार की आरोप-प्रत्यारोपांची हीच लढाई पुढे सुरू राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता या राजकीय तापलेल्या वातावरणात विद्यमान आमदार संजय देरकर पुढे येऊन स्पष्ट भूमिका मांडणार का, की टीकेच्या भडिमारातही शांत राहणार, हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

