अजय कंडेवार,वणी:- दुपारी 12 ते 12.30 वाजताची वेळ…ठिकाण वणी बसस्थानक…विकएन्डचा दिवस अन् गजबजलेला परिसर अशातच अचानक श्वान पथक आणि बॉम्ब शोधक, नाशक पथक, दंगल नियंत्रण पथक येऊन धडकते …वणी बस स्टँडमध्ये बॉम्ब असल्याची वार्ता शहरभर पसरते. वरिष्ठ पोलीस अधिकारीही बसस्थानकावर दाखल होतात. बसस्थानकावरील प्रवाशांमध्ये भीती पसरते.
वणी शहरातील मुख्य बस स्थानकात पोलीस अधिकारी अन् कर्मचार्यांची वाहने मोठ्या वेगात येतात आणि फिल्मी स्टाईलने पोलीस कर्मचारी बॉम्ब शोध पथक, श्वान पथक शोध घ्यायला सुरुवात करतात. हे पोलिसांचे मॉक ड्रील असले तरी एकाचवेळी पोलिसांची अनेक वाहने शहरात दाखल झाल्याने मोठी घटना घडल्याची चर्चा अन् अफवा होते मात्र काही वेळातच ही पोलिसांची मॉक ड्रिल असल्याचे पुढे येते आणि त्यानंतर सदरची कार्यवाही ही वणी पोलीस विभागातर्फे घेण्यात आलेली एक मॉक ड्रिल असल्याचे पोलीसांतर्फे मेगा फोनव्दारे नागरिकांना सांगण्यात आले. वणीकरांनी तसेच बस स्थानकावर असलेल्या प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडतात.
सदरची रंगीत तालीम (मॉक ड्रील)पोलीस अधीक्षक, यवतमाळ डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, वणी SDPO गणेश किद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सारंग बोम्पीलवार,पोउपनि परांडे, बॉम्ब शोधक व नाशक पथक, पोउपनि धवणे, प्रमुख QRT पथक, तसेच वणी पोलीस निरीक्षक अनिल बेहारनी,वाहतूक शाखा वणी स.पो.नि. वाघमारे, सपोनि सुरेश परसोडे अंगुलीमुद्रा, वैदयकीय अधिकारी, अग्निशामक दल यांनी केली.
“एखादा बॉम्ब हल्ला अथवा दहशतवादी हल्ला झाल्यास पोलीसांनी काय करावे तसेच नागरीकांनी प्रसंगावधान राखुन काय काळजी घ्यायला पाहिजे.याबाबत सदर रंगीत तालीम द्वारे प्रात्यक्षीक करून दर्शविण्यात आले तसेच नागरीकांनी जागरुक राहुन दहशतवादा संबंधी काहीही माहीती असल्यास नियंत्रण कक्ष यवतमाळ येथे फो.नं. 07232-242700 व डायल 112 वर संपर्क करुन कळवावे असे आव्हान यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात येत आहे.”