Ajay kandewar,Wani – तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही नियमानुसार परवानगी अथवा डिग्री नसताना हे बोगस डॉक्टर गोरगरीब रुग्णांवर उपचार करून त्यांच्या जीवाशी खेळत आहेत. हा सर्व प्रकार दिवसाढवळ्या सुरु असताना आरोग्य विभागाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे.
वणी तालुक्यात जवळपास दीडशे गावखेडी आहेत. यामध्ये खासगी रुग्णालयात भरमसाठ लुटमार सुरू असते. परिणामी, शासनाने गरिबांसाठी ग्रामीण भागात सुरु केलेले सरकारी रुग्णालये ओस पडत आहेत. याचाच फायदा घेऊन वणी परिसरामध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाल्याचे दिसत आहे.शहरातील नामवंत डॉक्टरांच्या हाताखाली दोन ते तीन वर्षे कम्पाऊंडरची नोकरी करून त्यानंतर हेच कम्पाऊंडर ग्रामीण भागात जाऊन डॉक्टरी व्यवसाय करतात. काही डॉक्टर वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असलेले मात्र, नियमानुसार नसलेले बोगस प्रमाणपत्र घेऊन ग्रामीण भागात आपला डॉक्टरचा व्यवसाय करताना दिसून येत आहेत. या बोगस व्यवसायापासून आर्थिक कमाई होत असली, तरी अशा बेकायदेशीर उपचारामुळे गोरगरीब रुग्णांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
शहरात जाऊन महागडा उपचार घेण्यापेक्षा जर गावातच कमी पैशात उपचार होत असल्याने अशिक्षित गोरगरीब गावातच उपचार घेतात; मात्र अनेक वेळा चुकीचा उपचार होऊन त्या रुग्णांवर विपरित परिणाम होतो व नंतर त्या रुग्णाला शहरात जाऊन महागड्या दवाखान्यात इलाज करावा लागतो. बोगस डॉक्टरांचा हा व्यवसाय जवळपास सर्वच खेडेगावात चालत आहे; परंतु त्या-त्या गावातील सरपंच, पोलीस पाटील व इतर लोकप्रतिनिधी काहीच बोलायला तयार नसतात. म्हणून मनसेने एक निवेदन 5 ऑगस्ट रोजी दिले आहे. वणी मनसेचां निवेदनात तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा गर्भित इशारा मनसे तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकर यांनी केला.
•तालुका व जिल्हा आरोग्य अधिकारी ( T.H.O) गप्प का…?
“तालुक्यात ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टरांचा व्यवसाय सुरु असताना तालुका व जिल्हा आरोग्य अधिकारी गप्प का आहेत. कारवाई का करीत नाहीत, याबाबत उलट-सुलट चर्चा सुरु आहेत.”
•कारवाई व्हायलाच पाहिजे….
“तालुक्यातील डॉक्टरांची कागदोपत्री तपासणी होणे महत्त्वाचे आहे. यावर नियंत्रण ठेवणारी कमिटी झोपेचे सोंग घेऊन बसली आहे. त्यामुळेच बोगस डॉक्टरांच्या वाढीला खतपाणी मिळत आहे. बोगस कोणी असतील तर चौकशी व्हावी आणी कारवाईसुद्धा व्हावी.”

