Ajay,Wani : तालुक्यातील राजूर ग्रामपंचायतीमध्ये १४ ऑक्टोबर रोजी वणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (BDO) किशोर गज्जलवार आणि राजूर ग्रामपंचायतीचे प्रशासक बी. एन. जाधव यांच्या उपस्थितीत गावातील विविध प्रश्नांवर चर्चा व मार्गदर्शन सत्र पार पडले. या वेळी घनकचरा व्यवस्थापनासाठी उभारण्यात आलेल्या शेडच्या बांधकामाची पाहणी BDO तर्फे करण्यात आली. तसेच ग्रामपंचायत परिसरातील अतिक्रमणाच्या प्रश्नावर गावकरी आणि संबंधित अधिकाऱ्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली.
अतिक्रमणासंदर्भातील प्रश्न, ग्रामपंचायतीची भूमिका आणि नागरिकांच्या अडचणी यांवर गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. या चर्चेदरम्यान अनेक गावकऱ्यांनी आपापले प्रश्न मांडले. त्यावर गटविकास अधिकारी यांनी उत्तरे देत संबंधित विषयांबाबत माहिती दिली. त्यामुळे हे चर्चासत्र केवळ औपचारिक बैठक न राहता नागरिकांना आपले प्रश्न थेट प्रशासनासमोर मांडण्याची संधी देणारे ठरले.सुमारे एक ते दीड तास चाललेल्या या चर्चासत्रात ग्रामपंचायत परिसरातील विविध विषयांवर विचारविनिमय करण्यात आला. यानंतर गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार यांच्या हस्ते ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रशासक बी. एन. जाधव, ग्रामपंचायत सचिव एस. टी. शेंडे, ग्रामपंचायत कर्मचारीवर्ग आणि गावकरी उपस्थित होते.

