Tuesday, October 13, 2026
HomeUncategorizedवणीत Full too ‘गेम’………..काँग्रेसची मते “गायब”?

वणीत Full too ‘गेम’………..काँग्रेसची मते “गायब”?

Ajay,Wani :- यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत जिल्हाभरात भाजप आणि शिवसेनेचे वर्चस्व दिसून आले असले, तरी वणी विधानसभा क्षेत्रातील वणी, मारेगाव आणि झरी तालुक्यांतील निकालांनी स्थानिक राजकारणात नवे प्रश्न उपस्थित केले आहेत. वणी तालुका गटात अपक्ष उमेदवार सुनील भाऊ कातकडे यांनी अवघ्या ४० मतांच्या फरकाने विजय मिळवला. मात्र, या निकालाने केवळ अपक्षाची ताकद अधोरेखित केली नाही, तर महायुतीच्या स्थानिक राजकीय गणितालाही धक्का दिला आहे. भाजपचे उमेदवार दीपकमत्ते यांना अपेक्षित मतदान का मिळाले नाही, काँग्रेसचे अधिकृत उमेदवार टीकाराम कोंगरे यांना केवळ आठ मते कशी मिळाली आणि दोन्ही पक्षांच्या मतांचे नेमके विभाजन कुठे झाले, असे प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहेत.

या निवडणुकीत भाजपचे उमेदवार दीपकमत्ते हे विश्वासू व्यक्तिमत्त्व म्हणून जनतेत ओळखले जात असल्याची चर्चा आहे. त्यांच्यासाठी माजी आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार यांच्यासह भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मेहनत घेतल्याचे सांगितले जाते. तरीही निकालात त्यांना अपेक्षित मतांचा पाठिंबा मिळाला नसल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रचारातील मेहनत, स्थानिक नेतृत्वाचे प्रयत्न आणि उमेदवाराची प्रतिमा या सगळ्यांचा विचार करता मतांचा अपेक्षित आकडा गाठण्यात अपयश का आले, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. दीपक मते यांचा बाहेरच्या विरोधकांनी पराभव केला की पक्षांतर्गत मतविभाजनाचा फटका बसला, वणी भाजपमधील काही घटकांकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही का, पडद्यामागे वेगळेच राजकीय गणित रचले गेले का, याबाबत तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. मात्र, अंतर्गत ‘गेम या चर्चांची सत्यता मतांची सविस्तर आकडेवारी आणि संबंधित नेत्यांच्या भूमिकेतूनच स्पष्ट होत आहे.

दुसरीकडे, काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार टिकाराम कोंगरे यांची राजकीय पार्श्वभूमीही या निकालामुळे चर्चेत आली आहे. मध्यवर्ती सहकारी बँकेत पद भूषविल्याचा अनुभव आणि विश्वस्त म्हणून असलेली ओळख असूनही त्यांना केवळ आठ मते मिळाले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला मतदान केले का, स्थानिक काँग्रेस नेत्यांची भूमिका काय होती आणि पक्षातील मतदारांचा काही भाग दुसऱ्या उमेदवाराकडे वळला का, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. काँग्रेसची मते फुटली असतील, तर ती नेमकी कोणाच्या पारड्यात गेली? हा या निवडणुकीतील सर्वांत महत्त्वाचा राजकीय प्रश्न ठरत आहे. टिकाराम यांना मिळालेली आठ मते ही आकडेवारी पक्षाच्या स्थानिक संघटनात्मक ताकदीबाबतही प्रश्न उपस्थित करते; मात्र त्यावरून संपूर्ण काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली, असा निष्कर्ष काढण्यासाठी अधिकृत मतमोजणीचा तपशील आणि स्थानिक नेत्यांच्या भूमिकेची पडताळणी आवश्यक आहे.

मारेगाव तालुक्यात किरणताई देरकर यांना मिळालेली १३ मते आणि झरी तालुक्यात संबंधित उमेदवाराला मिळालेली ११ मते यांचाही स्थानिक राजकीय समीकरणांच्या दृष्टीने विचार करावा लागणार आहे. जिल्हाभरात महायुतीची सरशी होत असताना वणी विधानसभा क्षेत्रातील निकाल वेगळे चित्र दाखवत असल्याने स्थानिक नेतृत्वाच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. सुनील भाऊ कातकडे यांचा अवघ्या ४० मतांनी झालेला विजय, दीपक मते यांना अपेक्षित मतदान न मिळणे आणि काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला मिळालेली केवळ आठ मते या तिन्ही बाबींचा एकत्रित विचार केल्यास मतविभाजनाचा मुद्दा दुर्लक्षित करता येणार नाही

 विजय अपक्षाचा; पण प्रश्न भाजप- काँग्रेस पक्षांसमोर…….

वणीच्या निकालाने एकाच वेळी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसमोर आत्मपरीक्षणाचे आव्हान उभे केले आहे. मेहनती विश्वस्त दीपक मते यांच्यासाठी मेहनत घेऊनही अपेक्षित मतदान न मिळणे आणि टिकाराम यांच्यासारख्या अनुभवी उमेदवाराला केवळ आठ मतांवर समाधान मानावे लागणे, या बाबी सामान्य राजकीय घडामोडी म्हणून बाजूला सारता येणार नाहीत. भाजपमध्ये दीपक मते यांचा अंतर्गत ‘गेम’ झाल्याची चर्चा आणि काँग्रेसमध्ये मतांची फूट पडल्याची शक्यता या दोन्ही मुद्द्यांची निष्पक्ष तपासणी होणे गरजेचे आहे. अखेर मतदारांनी कौल दिला, अपक्षाने बाजी मारली; पण काँग्रेसची मते कुठे गेली आणि भाजपच्या उमेदवाराला अपेक्षित पाठिंबा का मिळाला नाही, याचे उत्तर अजूनही गुलदस्त्यात आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page