Ajay,Wani:- विधानसभा मतदारसंघातील शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न थेट विधानभवनाच्या पायऱ्यांवर नेऊन आमदार संजय देरकर यांनी राज्य सरकारला अस्वस्थ केले. “विरोधी पक्षाचा आमदार असल्याने आता माझ्या वणी विधानसभा मतदारसंघाला शिक्षकही देणार नाहीत का?” असा थेट सवाल करणारा फलक हातात घेत त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले.तर विविध पक्षांतील आमदारांनीही त्यांच्या आंदोलनस्थळी जाऊन पाठिंबा दर्शवत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न पक्षीय राजकारणापलीकडचा असल्याची भावना व्यक्त केली.
वणी, झरी-जामणी आणि मारेगाव तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी निगडित हा प्रश्न केवळ आकड्यांचा नसून त्यांच्या भवितव्याचा असल्याची ठाम भूमिका देरकर यांनी मांडली. विरोधी पक्षाचा आमदार असला तरी मतदारसंघावर अन्याय होऊ देणार नाही, हा स्पष्ट संदेश त्यांनी सरकारला दिला. आंदोलनाची दखल घेत पालकमंत्री संजय राठोड यांनीही भेट देत सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले. मात्र, “वणीच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही,” असा निर्धार संजय देरकर यांनी व्यक्त केला आहे.

