Ajay Kandewar,Wani : सोयाबीनच्या शेतात पीक न उगवता शेतकऱ्यांच्या नशिबात फक्त प्रतीक्षा आणि नुकसानच पदरात पडल्याने वणी तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. मोठमोठ्या आश्वासनांच्या जोरावर सोयाबीन बियाण्यांची विक्री करणाऱ्या वीगर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे दावे प्रत्यक्ष शेतात सपशेल कोसळल्याचा आरोप होत आहे. 95 ते 110 दिवसांत काढणीस येणारे, संपूर्ण पांढरी फुले देणारे पीक दाखवणारी ही कंपनी आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून मात्र गायब असल्याचे चित्र आहे.
हंगाम संपत आला, 125 दिवस उलटले, तरीही पिकाला फळधारणा न झाल्याने अनेक शेतकरी आर्थिक गर्तेत अडकले आहेत. पीक नाही, उत्पन्न नाही आणि कंपनीकडून कोणतीही जबाबदारीही नाही, अशी स्थिती निर्माण झाल्याने या प्रकरणाला आता केवळ कृषी अपयश न मानता शेतकऱ्यांची उघड फसवणूक असल्याचे आरोप पुढे येत आहेत.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेत थेट प्रशासनाचे दार ठोठावले. मनसे वणी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या जीवावर व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना वेसण घालण्याची ही वेळ असून, अन्यथा अशा बियाण्यांच्या ‘धंद्यामुळे’ शेतकरी आत्महत्यांचा धोका आणखी वाढू शकतो, असा इशाराही मनसेकडून देण्यात आला.
मनसेने स्पष्ट शब्दांत सांगितले की, कागदावर गोड दावे करणाऱ्या पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या शेतात अपयशी ठरणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. विगर बायोटेकसारख्या कंपन्यांना जर आत्ताच थांबवले नाही, तर उद्या आणखी शेतकरी उद्ध्वस्त होतील, असा गंभीर सवाल उपस्थित करण्यात आला.या निवेदनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधत मनसेने शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम भूमिका घेतली असून, हा विषय दाबून टाकला गेला तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा सूचक इशाराही देण्यात आला आहे. शेतात पीक उगवले नाही, पण कंपनीविरोधात आता संताप उगवू लागला असून, या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.यावेळी शेतकरी पांडुरंग दुमोरे,लक्ष्मण उपरे, प्रतिक पानघाटे ,सचिन बोधाने ,संतोष पानघाटे, रवींद्र ढाले ,अरविंद निब्रड ,प्रशांत घागी, सुरेश विधाते, संदेश ढाले, विनोद वाबिटकर ,राहुल काकडे, सुरज काकडे, आशिष ठावरी उपस्थित होते.

