Ajay kandewar,Wani:- वणी नगर परिषदेत स्वतंत्र कक्षाच्या मागणीवरून सोमवारी विरोधी नगरसेवकांनी उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के यांच्या रिक्त कक्षासमोर सतरंजी अंथरून ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनानंतर नगर परिषदेत राजकीय वातावरण तापले असून, सत्ताधाऱ्यांनी मात्र विरोधकांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याची तयारी आधीपासूनच असल्याचा दावा केला आहे.
सत्ताधाऱ्यांच्या माहितीनुसार, भाजपची सत्ता स्थापन झाल्यानंतर उपलब्ध जागेनुसार सर्व पदाधिकाऱ्यांना कक्षांचे वाटप करण्यात आले होते. त्यावेळी महिला व बालकल्याण सभापतींसाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध नव्हता. महिला सभापतीला कामकाज करणे अशक्य होत होते त्यासाठी वणी मुख्याधधिकारी यांच्याकडे मागणी देखील करण्यात आलेली होती. त्यामुळे उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के यांच्या सेवानिवृत्तीनंतर रिक्त होणारा कक्ष महिला व बालकल्याण सभापतींसाठी राखून ठेवण्याचे प्रशासनाने यापूर्वीच मान्य केले होते.
दरम्यान, विरोधी नगरसेवकांसाठी स्वतंत्र कक्ष नसल्याची बाब मान्य करत नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी त्यांच्यासाठी नगर परिषदेच्या वरच्या मजल्यावरील प्रशस्त जनरल हॉल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या हॉलमध्ये खुर्च्या, टेबल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच बैठकीसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.सत्ताधाऱ्यांचे म्हणणे आहे की, विरोधी नगरसेवकांचा पूर्ण सन्मान राखत त्यांच्यासाठी पर्यायी व सर्व सुविधायुक्त व्यवस्था केली जात असताना विशिष्ट कक्षासाठी आंदोलन करण्याची भूमिका अनावश्यक आहे. त्यामुळे नगर परिषद वर्तुळात या आंदोलनाकडे राजकीय भूमिकेच्या दृष्टीने पाहिले जात आहे.
“विरोधी नगरसेवकांचा आम्ही पूर्ण सन्मान करतो. त्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून वरच्या मजल्यावरील प्रशस्त जनरल हॉल सर्व सुविधांसह उपलब्ध करून देत आहोत. खुर्च्या, टेबल, पिण्याचे पाणी आणि बैठकीसाठी आवश्यक सर्व व्यवस्था करण्यात येईल. महिला व बालकल्याण सभापतींसाठी पूर्वीपासून निश्चित असलेल्या कक्षावर वाद निर्माण करण्याची आवश्यकता नाही.”
— वणी न.प.नगराध्यक्ष विद्या आत्राम
“सध्याची नगर परिषद इमारत जुनी असल्याने जागेची मर्यादा आहे. तरीही विरोधी नगरसेवकांचा मान राखत त्यांच्यासाठी स्वतंत्र जनरल हॉल सुसज्ज करण्याचा निर्णय घेतला आहे. जनतेच्या प्रश्नांवर एकत्रितपणे काम करणे अधिक महत्त्वाचे असून अनावश्यक वाद टाळणे ही काळाची गरज आहे.”
— वणी न.प.उपाध्यक्ष राकेश बुग्गेवार

