Ajay Kandewar,Wani:- मेडिकल दुकान म्हणजे सेवा, जबाबदारी आणि विश्वास यांचा व्यवसाय. पण काही ठिकाणी हा व्यवसाय आता सेवेपेक्षा मनमानीचा आणि जबाबदारीपेक्षा नफेखोरीचा झाल्याची गंभीर चर्चा रंगू लागली आहे.परवाना एका नावाचा आणि दुकानात बसतो दुसराच , अल्पवयीन मुले मेडिकल दुकानात बसतात.नोंदणीकृत फार्मासिस्ट नसताना औषध विक्री, बिलाशिवाय व्यवहार, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे देण्याची सवय हे सर्व प्रकार फक्त नियमभंग नाहीत, तर जनतेच्या जीवाशी खेळण्याचे उघड धाडस आहे.
औषध विक्री ही भाजीपाला विक्री नाही की कुणीही काउंटरवर बसले आणि गोळ्या-पुड्या दिल्या. एक चुकीचे औषध, एक चुकीचा डोस, एक चुकीचा सल्ला आणि रुग्णाच्या जीवावर बेतू शकते. तरीही काही मेडिकल चालकांची वागणूक अशी दिसते की कायद्याला किंमत नाही, जनतेच्या आरोग्याला मोल नाही आणि जबाबदारीला तर जागाच नाही.सर्वात गंभीर बाब म्हणजे, असे प्रकार वणीत उघडपणे होत असतील तर मग प्रश्न फक्त मेडिकल दुकानदारांवरच नाही, तर यंत्रणा नेमकी झोपेत आहे का, की मुद्दाम डोळेझाक करते आहे? हा देखील आहे. कारण नियम फक्त कागदावर आणि गैरप्रकार प्रत्यक्षात अशी अवस्था असेल तर जनता शेवटी कोणावर विश्वास ठेवायचा?आज गरज आहे ती धडक तपासाची, पारदर्शक कारवाईची आणि दोषींना सरळ कायद्याचा हिसका दाखवण्याची गरज आहे. अन्यथा मेडिकलच्या नावाखाली सुरू असलेला हा बेजबाबदारपणा उद्या एखाद्याच्या घरात दुःखाचं कारण ठरू शकतो.
वाचा……मेडिकल दुकानांची नियमावली :….
1) वैध परवाना असणे बंधनकारक:-
मेडिकल दुकान चालवण्यासाठी अधिकृत परवाना आवश्यक असतो. परवाना एका नावाचा आणि दुकान चालवतो दुसराच, हा प्रकार सरळ संशयास्पद आहे.जनतेने लक्षात ठेवा: दुकानात परवाना आणि संबंधित माहिती दिसत नसेल तर प्रश्न जरूर विचारा.
2) नोंदणीकृत फार्मासिस्ट उपस्थित असणे आवश्यक:-
औषध विक्रीच्या वेळी नोंदणीकृत फार्मासिस्ट प्रत्यक्ष दुकानात असणे गरजेचे आहे. फक्त नाव लावून, दुसऱ्याच्या भरवशावर दुकान चालवणे हा गंभीर प्रकार आहे.जनतेसाठी सतर्कता: औषध देणारी व्यक्ती फार्मासिस्ट आहे का, हे विचारण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे.
3) डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय काही औषधे देणे गुन्हा ठरू शकते:-
अनेक औषधे, विशेषतः अँटिबायोटिक्स, शेड्युल औषधे, मनःशांतीची औषधे, इंजेक्शन्स, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देणे धोकादायक आणि नियमबाह्य असू शकते.जनतेने सावध राहा: “काय होतंय, घेऊन जा” म्हणणारे मेडिकल तुमच्या आरोग्याशी खेळत असू शकतात.
4) एक्सपायरी औषधे विक्रीस ठेवणे किंवा देणे हा थेट जीवाशी खेळ:-
कालबाह्य औषधांचा साठा ठेवणे, विकणे किंवा बदलून देणे हा गंभीर निष्काळजीपणा आहे.जनतेने काय करावे: प्रत्येक औषधाची expiry date तपासा. संशय आल्यास बिलासह तक्रार करा.
5) बिल देणे बंधनकारक:-
औषध विकून बिल न देणे म्हणजे व्यवहार झाकण्याचा प्रयत्न असू शकतो. बिलाशिवाय ग्राहकाकडे पुरावा राहत नाही.जनतेसाठी इशारा: बिल न देणाऱ्या मेडिकलवर लगेच संशय घ्या.
6) औषधांचे योग्य साठवण तापमान पाळणे आवश्यक:- काही औषधे, इंजेक्शन्स, इन्सुलिन, लसी यांना विशिष्ट तापमानात ठेवणे आवश्यक असते. फ्रिजमध्ये ठेवायचे औषध उघड्यावर ठेवणे म्हणजे सरळ निष्काळजीपणा.जनतेने तपासा: थंड साखळीतील औषधे योग्य पद्धतीने दिली जात आहेत का?
7) बनावट, चुकीचे किंवा दुसऱ्या कंपनीचे औषध जबरदस्तीने देऊ नये:-
डॉक्टरांनी लिहिलेले औषध न देता स्वतःच्या मर्जीनुसार दुसरे औषध ढकलणे हा प्रकार संशयास्पद ठरतो.जनतेने सावध राहा: “हेच चालेल” म्हणत औषध बदलले तर कारण विचारा.
8) प्रशिक्षित नसलेल्या व्यक्तीकडून औषध विक्री होऊ नये:– लहान मुले, नातेवाईक, अननुभवी कर्मचारी किंवा फक्त दुकान सांभाळणारे लोक औषध देत असतील तर तो प्रकार धोकादायक आहे.जनतेला संदेश: औषध विक्री ही किराणा मालासारखी गोष्ट नाही; चुकीची गोळी जीवावर बेतू शकते.
9) नोंदी व रजिस्टर व्यवस्थित ठेवणे आवश्यक:-
विशेष औषधे, शेड्युल औषधे, स्टॉक, खरेदी-विक्री याची व्यवस्थित नोंद असणे महत्त्वाचे आहे. नोंदीच नसतील तर व्यवहार किती पारदर्शक आहे, यावर प्रश्नचिन्ह उभे राहते.जनतेने समजा: रजिस्टरमध्ये गोंधळ म्हणजे दुकानात नियमांपेक्षा मनमानी जास्त असू शकते.
10) ग्राहकाला योग्य माहिती देणे ही जबाबदारी आहे:-
डोस, वेळ, वापर पद्धत, काळजी, साइड इफेक्ट्स याबाबत योग्य मार्गदर्शन देणे अपेक्षित असते. औषध हातात दिलं आणि “जा पुढे” अशी भूमिका ही बेफिकिरी आहे.
11)डॉक्टर च्या चिट्टी शिवाय औषध विक्री करू नये.
13) औषधात सबस्टाट्यूट करू नये.
क्रमशः….

