Ajay Kandewar,Wani:- चंद्रपूर येथे सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत मानवतेचा आणि जागतिक शांततेचा अनोखा संदेश दिला. तब्बल १३५८ विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून ‘शांतता चिन्ह’ साकारले, आणि या उल्लेखनीय उपक्रमाची नोंद Guinness World Records मध्ये झाली आहे.
या भव्य उपक्रमाचे आयोजन शनिवारी सकाळी करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी केवळ एक आकृती तयार केली नाही, तर जगभरात वाढत्या संघर्ष आणि अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर “युद्ध नव्हे, शांतता हवी” हा प्रभावी संदेश दिला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विविध मान्यवर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नांचे कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा आणि एकात्मतेची भावना वाढीस लागते, असे मत व्यक्त केले.विशेष म्हणजे, दक्षिण भारतातील यापूर्वीच्या विक्रमाला मागे टाकत चंद्रपूरने हा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. गिनीज बुकच्या प्रतिनिधींनी याची अधिकृत नोंद घेत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान केले.या उपक्रमामुळे चंद्रपूरचे नाव जागतिक स्तरावर उजळले असून, विद्यार्थ्यांच्या एकजुटीने समाजाला शांततेचा आणि मानवतेचा संदेश देण्याचा हा प्रेरणादायी प्रयत्न ठरला आहे.यावेळी विशेष अतिथी म्हणून आ. सुधीर मुनगंटीवार, सोमय्या ग्रुपचे सर्वेसर्वा पांडुरंग आंबटकर, पीयूष आंबटकर, गिनीज बुकचे महानिर्णयक स्वप्नील डोंगरीकर व समनव्यक मिलिंद वार्लेकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

