•अनेकांना दिसू लागली आहे आमदाराची खुर्ची
•मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन कीर्तन सोहळे व कार्यक्रम घेणे सुरू.
अजय कंडेवार, वणी:- २०२४ चे वर्ष जसे आले आहे तसतशा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणूक झाल्यावर संपूर्ण देशाला लोकसभेचे वेध लागले आहेत. निवडणुका होणार असल्याची शक्यता जाणकारांनी वर्तवल्यामुळे इच्छुक आत्तापासून जोर लावू बघत आहेत. त्यामुळे विशेषतः वणीत अनेकांना आमदारकीची स्वप्न पडण्यास सुरु झाली असून त्यातील काही उत्साही मंडळींनी फ्लेक्स लावत आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे.
२०१९ साली झालेल्या निवडणुकीला ४ वर्षे उलटून गेले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीतल्या इच्छूकांनी आपल्या शिडात वारे भरण्यास सुरुवात केली आहे. पुढच्या निवडणुकीत आपला माणूस, भावी आमदार अशा टॅगने चौकाचौकात फ्लेक्स लावले आहेत. एवढेच नाही तर काहींनी याद्या घेऊन टार्गेटही ठरवण्यास सुरुवात केली आहे. वणी मतदारसंघ काही ग्रामीण भागात येत असल्याने काहींनी ग्रामीण भागात भजन, कीर्तन महोत्सव घेतले आहेत. ग्रामीण भागातील मंदिरात आयोजित करण्याचीही चढाओढ लागली आहे.शहरी भागातही अनेकांना दररोज सकाळी शुभसकाळ आणि शुभसंदेश पाठवण्यास सुरुवात केली असून त्यामुळे काहींनी वैतागून या अतिउत्साहींना ब्लॉक केले आहे.
उमेदवारी हवी असलेल्यांनी राजकीय वरिष्ठांकडे फेऱ्या मारण्यास सुरुवात केली आहे. इतकेच नव्हे तर अनेकांनी मतदार संघात पक्षाचे कार्यक्रम, उपक्रम घेण्यास सुरुवात केली आहे. मागील निवडणुकीत हरलेले उमेदवार नव्या उमेदीने उभे राहीले असून जागोजागी त्यांनी केलेल्या पोस्टरबाजीमुळे त्यांच्या आशा पल्लवीत झाल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीला कमीतकमी कालावधी शिल्लक असल्याने अजूनतरी यावर कोणीही भाष्य करायला तयार नाही. मात्र अनेकांनी जोरदार तयारी सुरु करून गुडघ्याला बाशिंग बांधल्याचे वणीकरांना दिसत आहे.