Ajay,Wani: शहरातील स्वर्णलीला इंग्लिश मीडियम स्कूल येथे तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. माजी तालुका क्रीडा संयोजक ठावरी, तालुका क्रीडा संयोजक चिलखावार यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच स्वर्णलीला इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धेचे उद्घाटन झाले. मान्यवरांनी बुद्धिबळाचा डाव खेळून स्पर्धेला सुरुवात केली. तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या स्पर्धेत सुशगंगा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध वयोगटांत उल्लेखनीय कामगिरी केली. U-14 गटात हर्षिता घुगल, U-17 गटात सहारा शेख, तर U-19 गटात अनन्या मस्के, निराली निघोट, सानवी खोब्रागडे, सर्वज्ञ जोगी आणि अनुज संगमवार यांनी दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळविला. या सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या या कामगिरीत शारीरिक शिक्षक गौतम जीवने यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक प्रदीप बोनगीरवार, मॅनेजिंग डायरेक्टर मोहन बोनगीरवार आणि प्राचार्य देबोश्री शाहा यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. बुद्धिबळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, तर्कशक्ती, संयम आणि निर्णयक्षमता विकसित होत असून, सुशगंगा स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश शाळेसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

