Ajay kandewar,Wani : तालुक्यातील राजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कथित भोंगळ आणि मनमानी कारभारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. राजूर PHC मध्ये रुग्णांची सातत्याने होत असलेली हेळसांड, वेळेवर डॉक्टर उपलब्ध नसणे, तसेच उपचारासाठी आलेल्या नागरिकांना तासन्तास हेलपाटे मारावे लागत असल्याने आता गावकऱ्यांनी थेट आक्रमक भूमिका घेतली आहे. “हे दोन्ही मुजोर डॉक्टर आता राजूरमध्ये नकोच,” अशी थेट मागणी करत नागरिकांनी जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO) यांच्याकडे तक्रारी धाडल्या आहेत. विशेष म्हणजे एका रुग्णाला तब्बल दोन तास प्रतीक्षा करावी लागल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे.
ग्रामस्थांच्या आरोपानुसार, प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेकदा अधिकृत डॉक्टर गैरहजर असतात, तर नर्स आणि कंपाऊंडरच उपचार करत असल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे. “कधी नर्स डॉक्टर बनते, तर कधी कंपाऊंडर उपचार करतो आणि अधिकृत डॉक्टर फक्त खुर्ची सांभाळतात,” असा संतप्त आरोप नागरिकांनी केला आहे. या PHC संदर्भात यापूर्वीही अनेक तक्रारी झालेल्या असून, तरीही संबंधितांवर ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आता तालुका आरोग्य अधिकारी (THO) वरिष्ठांकडे नेमका कोणता अहवाल पाठवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, “या दोन्ही डॉक्टरांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अन्यथा राजूरमध्ये तीव्र आंदोलन उभारले जाईल,” असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. “रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी आता जोर धरत आहे. स्थानिक आरोग्य विभाग आणि वरिष्ठ अधिकारी आता या गंभीर प्रकरणात कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

