Ajay, Wani : वणी शहरातील साई मंदिर चौकातील नव्याने सुरू झालेल्या सरस्वती हॉस्पिटल येथे डॉ. लिमजे यांच्या पुढाकारातून १ ऑगस्टपासून सुरू करण्यात आलेल्या ‘आजी-आजोबा ओपीडी’ या उपक्रमाला अवघ्या दोनच दिवसांत ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. केवळ ५० रुपयांत तपासणी, वैद्यकीय सल्ला आणि आवश्यक उपचार उपलब्ध होत असल्याने शहरातील अनेक आजी-आजोबा सकाळपासूनच सरस्वती हॉस्पिटलमध्ये दाखल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आजी आजोबा ओपीडी नेहमी रविवार ते शुक्रवार पर्यंत सुरू राहील.
महागड्या उपचारांच्या काळात ज्येष्ठांसाठी माफक शुल्क 50 रु आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा डॉ. लिमजे यांचा सामाजिक संकल्प वणीकरांच्या मनाला भिडला आहे. दिवंगत आई-वडिलांच्या स्मृतीत सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, रुग्णांसह त्यांच्या कुटुंबीयांकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे. वाढत्या प्रतिसादामुळे सरस्वती हॉस्पिटलमधील ‘आजी-आजोबा ओपीडी’ वणी शहरातील ज्येष्ठांसाठी आशेचा किरण ठरत असून, समाजाभिमुख आरोग्यसेवेचा आदर्श उपक्रम म्हणून त्याची ओळख निर्माण होत आहे.

