Ajay Kandewar,Wani:-काळ पुढे सरकत गेला, आयुष्याच्या वाटा बदलत गेल्या, अनेक जण व्यवसाय, नोकरी आणि संसारात व्यस्त झाले; मात्र महाविद्यालयीन दिवसांतील मैत्रीचे ते नाते आजही तितकेच जिवंत असल्याचे चित्र रविवारी वणी येथे पाहायला मिळाले. लो.टी. महाविद्यालय, वणी येथील बी.ए. शैक्षणिक सत्र 2003–2006 या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला.
तब्बल 20 वर्षांनंतर एकमेकांना भेटलेल्या मित्र-मैत्रिणींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. कुणी जुन्या आठवणींमध्ये रमले होते, तर कुणी कॉलेजमधील खोडकर किस्से आठवत हसत होते. काही क्षण असेही आले, जेव्हा जुन्या मित्रांच्या भेटीने अनेकांच्या डोळ्यांत नकळत आनंदाश्रू दाटून आले.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विजय मुकेवार यांची उपस्थिती लाभली. तसेच माजी प्राचार्य अनिल हूड, प्राचार्य प्रसाद खानझोडे, प्राचार्य धर्मेंद्र तेलगोटे, प्रा. दिलीप अलोणे आणि प्रा. अभिजित अणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गुरुजनांना पाहताच अनेक माजी विद्यार्थी पुन्हा आपल्या कॉलेज जीवनात हरवून गेले. गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना अनेकांच्या भावना अनावर झाल्या.
सकाळच्या सत्रात लो.टी. महाविद्यालय परिसरात आठवणींची मैफल रंगली. “ते दिवस पुन्हा यावेत” अशी भावना प्रत्येकाच्या मनात दाटून आली होती. कॉलेजचा कट्टा, वर्गातील गंमती-जमती, सांस्कृतिक कार्यक्रम, परीक्षा आणि मित्रांसोबत घालवलेले क्षण यांची उजळणी करताना वातावरण भावुक झाले होते.सायंकाळी महालक्ष्मी हॉल येथे झालेल्या दुसऱ्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, संगीत मैफील आणि सत्कार समारंभाने रंगत आणली. जुन्या मित्रांसोबत पुन्हा एकदा गप्पांचा फड रंगला आणि अनेकांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात हे अविस्मरणीय क्षण कैद केले.
या स्नेहमेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी अतुल गोंडे, राहुल ठेंगणे, गणेश गोखरे, जितू पाटील, सचिन मत्ते, मंगेश आवारी, प्रफुल क्षीरसागर, विजया बोढे, निलिमा म्हसे, कल्पना चटप आणि रेणू उसेवार यांनी विशेष मेहनत घेतली. सर्व सहाध्यायींच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.


