Ajay kandewar ,Wani : वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेना (शिंदे गट) अधिक मजबूत करण्यासाठी सक्षम, अनुभवी आणि जनमानसात प्रभाव असलेल्या नेतृत्वाची गरज असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोर धरत आहे. पक्षाच्या महत्त्वाच्या जिल्हास्तरीय जबाबदारीसाठी विजय चोरडिया, मनिष सुरावार, दीपक कोकास आणि आशिष खुलसंगे या चार अनुभवी चेहऱ्यांची नावे चर्चेत असून, या चौघांपैकी कोणाच्या खांद्यावर वरिष्ठ नेतृत्व मोठी जबाबदारी सोपवणार, याकडे शिवसैनिकांसह संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. चारही नेते आपापल्या क्षेत्रात ‘रगड’ असले, तरी संघटनात्मक अनुभव, कार्यकर्त्यांशी असलेला थेट संपर्क, राजकीय रणनीती आणि जनमानसातील स्वीकारार्हता पाहता विजय चोरडिया आणि मनिष सुरावार यांचे पारडे सध्या तुलनेने जड असल्याची चर्चा आहे. कारण हे दोघेही जनमानसेत म्हणजे जनसेवेत राहणारे लोक आहेत यांना जनसेवा हीच खरी सेवा मानले जाते नाही तर अन्य अशी आहे काही जनसेवेच्या नावाखाली आपले “पॉकिटा भरणारे” सुद्धा नेते “जिल्हाध्यक्ष पदासाठी” तयार आहे अशी ही चर्चा आहे.
1) शांत-संयमी कार्यकर्त्यांचा विश्वास आणि पक्षविस्ताराची ताकद जनतेसाठी धावणारा विजय चोरडिया
विजय चोरडिया यांनी शांत, संयमी आणि सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या कार्यपद्धतीतून पक्ष संघटनेत स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. वणी शहरासह ग्रामीण भागात पक्षाची मुळे मजबूत करण्यासाठी त्यांचा सातत्यपूर्ण संपर्क, पदाधिकाऱ्यांमधील समन्वय आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याची शैली ही त्यांची मोठी जमेची बाजू मानली जाते. कोणताही अनावश्यक गाजावाजा न करता संघटन उभारणीवर भर देणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे पक्षाला संयमी, सर्वसमावेशक आणि संघटनात्मक पकड असलेला चेहरा हवा असल्यास विजय चोरडिया हे वरिष्ठांसमोर मजबूत पर्याय ठरू शकतात.
2)जनसंपर्क, संघटनक्षमता, कार्यकर्त्यांची मजबूत फळी ठेवणारा राजकीय ‘चाणक्य’ मनिष सुरावार
मनिष सुरावार यांची राजकीय कारकीर्द दीर्घ आणि विविध अनुभवांनी समृद्ध आहे. १९९६ मध्ये भारतीय विद्यार्थी सेनेपासून सुरू झालेल्या त्यांच्या प्रवासात विविध राजकीय संघटनांतील कामाचा अनुभव आहे. विद्यार्थी आंदोलने, संघटन उभारणी, स्थानिक स्वराज्य संस्थांतील राजकीय समीकरणे आणि कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी करण्याचे कौशल्य यामुळे त्यांची ओळख ‘राजकीय चाणक्य’ आणि ‘किंगमेकर’ अशी निर्माण झाली. वणी नगरपरिषदेच्या राजकारणातील अनेक समीकरणांमध्ये त्यांच्या रणनीतीची चर्चा होत आली आहे. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि पालकमंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनात ते सक्रिय आहेत. पक्षाला आक्रमक संघटक, अनुभवी रणनीतीकार आणि राजकीय डावपेचांची जाण असलेला नेता हवा असल्यास मनिष सुरावार यांचे नावही तितक्याच ताकदीने पुढे येते.
3) कट्टर शिवसैनिक सामन्यांचा आवाज दीपक कोकास
दीपक कोकास यांची ओळख अनेक वर्षांपासून पक्षाशी निष्ठा जपणारे कट्टर शिवसैनिक अशी आहे. विविध वरिष्ठ नेत्यांसोबत काम करताना त्यांनी पक्षाशी असलेली बांधिलकी कायम ठेवली. विविध पदांवर कामाचा अनुभव, समाजसेवेतील सहभाग आणि सर्वांशी सलोख्याचे संबंध ही त्यांची बलस्थाने आहेत. दीर्घकाळ पक्षसंघटनेत सक्रिय राहिल्याने त्यांच्याकडे अनुभवाची मोठी शिदोरी असून, निष्ठावान आणि जुन्या जाणत्या शिवसैनिकाचा चेहरा म्हणून त्यांचे नावही या शर्यतीत दुर्लक्षित करता येणार नाही.
4)आशिष खुलसंगे : पक्षांतरांच्या वळणावळणानंतर पुन्हा ‘घरवापसी’…
या चार नावांमध्ये आशिष खुलसंगे यांचा राजकीय प्रवास सर्वाधिक वळणावळणाचा राहिला आहे. शिवसेनेतून राजकीय वाटचाल सुरू केल्यानंतर अपेक्षित राजकीय समीकरणे न जुळल्याने त्यांनी काँग्रेसची वाट धरली. काँग्रेसमध्ये असताना त्यांना सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या वसंत जिनिंगच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली आणि सत्तेचा अनुभवही घेता आला. मात्र पुढे संस्थेतील अंतर्गत मतभेद आणि राजकीय संघर्ष तीव्र झाल्यानंतर त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्यात आले व त्यांना अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागल्याचे सांगितले जाते.यानंतर काँग्रेसमधील त्यांची राजकीय पकडही कमकुवत होत गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. झरी तालुकाध्यक्षपदाची जबाबदारीही हातातून गेल्याने एकीकडे सहकार क्षेत्रातील अध्यक्षपद, तर दुसरीकडे पक्षातील संघटनात्मक पदही निसटले. अशा परिस्थितीत पुन्हा जुन्या राजकीय घराची आठवण झाली .अखेर खुलसंगे यांनी पुन्हा शिवसेनेची वाट धरत पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिंदे सेनेत प्रवेश केला.
याच पार्श्वभूमीवर विजय चोरडिया यांची संघटनात्मक पकड आणि मनिष सुरावार यांचा दीर्घ राजकीय अनुभव व रणनीती अधिक चर्चेत येत असून, या दोघांचे पारडे तुलनेने जड असल्याचे बोलले जात आहे.एकीकडे चोरडियांचा शांत संघटनवाद, दुसरीकडे सुरावारांची ‘चाणक्य नीती’, तिसरीकडे कोकासांची दीर्घकालीन शिवसेना निष्ठा आणि चौथीकडे खुलसंगे यांचा पक्षांतरांनी भरलेला राजकीय अनुभव आता वरिष्ठांना म्हणजेच नेते ना.संजय राठोड सातत्य हवे, निष्ठा हवी, संघटनक्षमता हवी, राजकीय अनुभव की नेता म्हणून जिल्ह्यातील “माया गोळा “ करणारा हवा ? यावरच जिल्हाध्यक्षपदाचा अंतिम फैसला अवलंबून राहणार आहे.

