Wani : विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करून जबाबदार नागरिकत्वाची जाणीव दृढ करण्याच्या उद्देशाने तालुका विधी सेवा समिती, वणी यांच्या वतीने मार्कंडेय पोदार लर्न स्कूल येथे ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’ अंतर्गत विधी जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष मा. पी. एस. जोठे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना कायद्याचे पालन, न्यायव्यवस्थेचे महत्त्व, सामाजिक जबाबदारी आणि आदर्श नागरिक बनण्याची प्रेरणा देत ‘नालसा’ (NALSA) व ‘डॉन’ (DAWN) या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) मा. एस. डी. भोसले यांनीही विद्यार्थ्यांना कायद्याचे महत्त्व, घटनात्मक हक्क आणि कर्तव्यांविषयी मार्गदर्शन केले. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. नागरे यांनी सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक आणि डिजिटल सुरक्षिततेबाबत सविस्तर माहिती देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी वणी बार असोसिएशनचे सदस्य अॅड. धनंजय आसुटकर यांनी शिक्षणाचा अधिकार व त्याचा प्रभावी वापर यावर मार्गदर्शन केले, तर अॅड. पूजा बोथे यांनी महिला सुरक्षा आणि महिलांसाठी उपलब्ध असलेल्या कायदेशीर तरतुदींची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनल कटरे व पौर्णिमा चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रियंका दानव यांनी मानले. कार्यक्रमाला मार्कंडेय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रमेश संकुरवार, सचिव राहुल संकुरवार, प्रवीण संकुरवार तसेच मार्कंडेय पोदार लर्न स्कूलचे प्राचार्य भूषण अनेले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विधी जनजागृती उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला.

