Ajay Kandewar,Wani:- नगरपरिषद निवडणुकीचा धुरळा चांगलाच रंगात आला असताना प्रभाग क्र. 8 मध्ये एक अनपेक्षित पण गाजणारी राजकीय हालचाल समोर आली आहे. शिंदे शिवसेनेचा उमेदवार राजू रिंगोले याच्या मदतीसाठी उबाठाचे सक्रिय कार्यकर्ते उमेश पोद्दार यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून प्रचाराची सूत्रे हातात घेतली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, “पक्ष नाही… मित्र महत्त्वाचा!” या भावनेतून उमेश पोद्दार यांनी पक्षराजकारणापेक्षा मैत्रीधर्माला प्राधान्य देत राजू रिंगोले यांच्या प्रचारात जोमाने सहभाग सुरू केला आहे. स्थानिक पातळीवर या घडामोडीची जोरदार चर्चा असून यामुळे निवडणुकीचे समीकरण अधिकच रंगतदार झाले आहे. प्रभाग 8 मध्ये राजू रिंगोले यांच्या प्रचाराची लय जोर धरत असून, घराघरात मिळणारा प्रतिसाद उल्लसभरलेला आहे. पोद्दार यांच्या सहभागामुळे प्रचारमोहीमेत उत्साह, गती आणि नवीन उर्जा प्राप्त झाल्याचे वातावरण कार्यकर्त्यांमध्ये जाणवत आहे.स्थानिक नागरिकांमध्येही या अनपेक्षित समर्थनाची चर्चा रंगली आहे.“प्रभाग क्रमांक 8 मध्ये हे ‘मैत्री समर्थन’ चांगलेच गाजत असून आगामी मतदानात या हालचालीचा किती मोठा प्रभाव पडतो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

