अजय कंडेवार,वणी : वणी तालुक्यातील बाबापूर येथील नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाप्पाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक बाबापूरला येतात. कायरपासून काही अंतरावर असलेल्या बाबापूर येथे गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत मोठी गर्दी होते. मात्र, भाविकांची वाढती संख्या आणि वाहनांची मोठी वर्दळ पाहता पार्किंगची व्यवस्था हा दरवर्षीचा गंभीर प्रश्न ठरत होता. कायर ते बाबापूर हे अंतर 3 km चे असल्याने वाहनांसाठी योग्य व्यवस्था नसल्यामुळे भाविकांची मोठी गैरसोय होत होती.
यंदा बाबापूर गणेश मंडळाच्या समितीने हा प्रश्न गजानन ग्रुप ऑफ कन्स्ट्रक्शनचे संचालक तथा गिट्टी क्रेशर व्यावसायिक जयंत मामीडवार यांच्या निदर्शनास आणून दिला. भाविकांची गैरसोय लक्षात घेऊन मामीडवार यांनी कोणताही विलंब न करता पार्किंगसाठी आवश्यक मुरूम व क्रेशरमधील मटेरियल स्वखर्चाने उपलब्ध करून दिले. तब्बल २०० ते २५० ट्रक मुरूम व मटेरियल उपलब्ध करून देत लाखों रुपयांची भरीव मदत त्यांनी केले. या मदतीमुळे जवळपास चार एकर जागेवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून, यंदा बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.
बाबापूर गणेश मंडळाच्या नियोजन समितीच्या सदस्यांनी जयंत मामीडवार यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. बाबापूर गणेश मंडळाला आजपर्यंत मिळालेल्या मदतीपैकी ही सर्वात मोठी मदत असल्याचे त्यांनी सांगितले. भाविकांच्या पार्किंगचा प्रश्न मंडळाने त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी एका शब्दात मदतीला प्रतिसाद देत एवढ्या मोठ्या प्रमाणात मुरूम व मटेरियल उपलब्ध करून दिले. दरम्यान, या सहकार्याबद्दल २० सप्टेंबर रोजी जयंत मामीडवार व त्यांच्या परिवाराचा बाबापूर गणेश मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. बाप्पाच्या सेवेसाठी केलेले हे योगदान मंडळ कधीही विसरणार नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
“बाबापूर गणेश मंडळाला आजपर्यंत मिळालेल्या मदतीपैकी जयंत मामीडवार यांनी केलेले सहकार्य सर्वात मोठे आहे. भाविकांच्या पार्किंगचा प्रश्न आम्ही त्यांच्यासमोर मांडला आणि त्यांनी कोणताही विचार न करता २५० ट्रक मुरूम व मटेरियल लाखोंचे स्वखर्चाने उपलब्ध करून दिले. त्यांच्या या सहकार्यामुळे चार एकर जागेवर पार्किंगची व्यवस्था पूर्ण करता आली. बाप्पाच्या सेवेसाठी लाभलेले हे सहकार्य आम्ही कधीही विसरणार नाही.” — सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, बाबापूर व ग्रामस्थ

