Ajay,Wani : जय श्रीकृष्णच्या जयघोषाने आणि ढोल-ताशांच्या गजराने रविवारी वणी शहर भक्तिमय झाले. श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव समितीच्या वतीने अमृत भवन येथून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. डीजेची रोषणाई, ढोल-ताशांचा निनाद आणि विविध धार्मिक देखाव्यांमुळे शोभायात्रेने शहराचे लक्ष वेधून घेतले.
शोभायात्रेत वारकरी व पदावली भजन मंडळांनी सादर केलेली भक्तिगीते, नंदीवर स्वार भगवान शंकर-पार्वती, वीर बजरंगबली तसेच विविध देवी-देवतांचे आकर्षक जिवंत देखावे सहभागी झाले होते. अघोरी तांडव नृत्य, गोंडी ढेमसा नृत्य, असुरांची झांकी आणि गोरिलाचा देखावा हे बालगोपालांसह नागरिकांचे विशेष आकर्षण ठरले. धुमाळ बँड आणि ढोल-ताशांच्या तालावर पारंपरिक वेशभूषेतील भाविकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
शहरातील प्रमुख मार्गांवरून शोभायात्रा मार्गक्रमण करत असताना ठिकठिकाणी नागरिकांनी स्वागत केले. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांसह हजारो भाविक सहभागी झाल्याने शोभायात्रेला भव्य स्वरूप प्राप्त झाले. समितीच्या वतीने भाविकांसाठी फराळ व थंडपेयाचे वितरण करण्यात आले.जय श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव समितीचे मार्गदर्शक विजयबाबू चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्ष ॲड. कुणाल विजय चोरडिया यांच्या नेतृत्वात या उत्सवाचे आयोजन करण्यात आले. शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

