Ajay Kandewar,Wani:- नगर परिषद वणीच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या काही सफाई कर्मचाऱ्यांना मानसिक व प्रशासकीय त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या संदर्भात (शिंदे गट)शिवसेनेचे जिल्हा संघटक विजय चोरडिया यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत संबंधित आरोग्य निरीक्षकांवर कारवाईची मागणी केली आहे.

निवेदनानुसार, सफाई कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्त अतिरिक्त कामे करून घेतली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर, संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत तक्रार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुद्दाम लक्ष्य करून त्यांना मानसिक त्रास दिला जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रकार सुरू असल्यास तो अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. शहराची स्वच्छता राखणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्याऐवजी त्यांना त्रास देण्याची भूमिका प्रशासनातील काही घटक घेत असतील, तर त्याचा परिणाम थेट कामकाजावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात समन्वय असणे आवश्यक असताना आरोग्य विभागात वाढत चाललेली नाराजी भविष्यात संघर्षाचे रूप धारण करू शकते, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून त्या “गेंडुरगिटक्याला” हटवून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. अन्यथा शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन छेडेल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला .


