Ajay Kandewar,यवतमाळ : जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री आणि तस्करीविरोधातील कारवायांबाबत अन्न व औषध प्रशासन (FDA) प्रशासनाची भूमिका पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. विभागाकडे वेळोवेळी माहिती, तक्रारी आणि निवेदने देण्यात येत असतानाही अनेक प्रकरणांमध्ये अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप विविध स्तरांतून होत आहे. त्यामुळे FDA विभागातील काही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचे गुटखा तस्करांशी कथित साटेलोटे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यात विशेषतः ‘महा – Jan’ कुचकामी ठरत आहे आणि त्यांचे गडी मात्र गाडी घेऊन आम्ही कारवाईसाठी आलो असे बोम्या मारत असल्याचे गावभर सांगत फिरत असल्याचे चूगलखोर चित्र समोर येत आहे.

विशेष म्हणजे, काही तक्रारदारांनी असा दावा केला आहे की FDA विभागाला अवैध गुटखा साठा किंवा वाहतुकीची माहिती दिल्यानंतर संबंधित तस्करांना “कारवाई पथक निघाले आहे” अशा स्वरूपाचे फोन किंवा संदेश पोहोचत असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे कारवाईपूर्वीच पुरावे गायब होणे किंवा संबंधित आरोपी सतर्क होणे, असे प्रकार घडत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकारामागे नेमके कोण आहे, अधिकारी की कर्मचारी, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी नसली तरी या संशयामुळे विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हावी, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची भूमिका तपासण्यात यावी आणि सत्य जनतेसमोर यावे, अशी मागणी पत्रकार संघटनांकडून केली जात असल्याची माहिती आहे. यासाठी काही पत्रकार प्रतिनिधी लवकरच वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसह ज्येष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. तसेच, काही माध्यमांकडे या संदर्भातील कथित पुरावे उपलब्ध असून योग्य वेळी ते सार्वजनिक करण्यात येणार असल्याचा दावाही समोर येत आहे. त्यामुळे यवतमाळ FDA विभागावरील हे आरोप आगामी काळात आणखी मोठे राजकीय व प्रशासकीय वादळ निर्माण करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

