Ajay Kandewar,Wani:- वणी शहरातील काही मेडिकल दुकानांमध्ये परवाना एका व्यक्तीच्या नावावर असताना दुकानात दुसरी व्यक्ती बसणे, तसेच अनुभव नसलेले लोक आणि अगदी 14 वर्षांखालील मुलांकडून औषध देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर वणी तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मण उरकुडे यांनी कठोर शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही बेजबाबदार वर्तनाला मेडिकल असोसिएशन कधीही पाठराखण करणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
लक्ष्मण उरकुडे यांनी स्पष्टपणे सांगितले की‘अश्यांना पाठीशी घालणार नाही’ व्यवसाय हा केवळ दुकानदारी नसून तो नागरिकांच्या जीवाशी थेट संबंधित आहे. त्यामुळे परवाना एका नावावर आणि दुकानात दुसराच व्यक्ती बसून औषध देत असेल, किंवा अनुभव नसलेले लोक औषधे देत असतील, तर हा गंभीर नियमभंग आहे. अशा प्रकारांवर ड्रग्स इन्स्पेक्टरांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत नियम मोडणाऱ्यांना कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. उरकुडे यांनी स्पष्ट केले की, नियम पाळून व्यवसाय करणाऱ्या प्रामाणिक मेडिकल धारकांच्या पाठीशी संघटना ठामपणे उभी आहे. मात्र बेजबाबदारपणे नियमांची पायमल्ली करून लोकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी जोरदार मौखिक मागणी विदर्भ न्यूज पोर्टल चा माध्यमातून केली.

