Ajay Kandewar,Wani :- वणी शहरातील काही मेडिकल दुकानांमध्ये सुरू असलेला कारभार पाहिला तर आरोग्य व्यवस्थेचीच थट्टा उडत असल्याचे व्हिडिओ आणि फोटो यांचा पुराव्यानिशी समोर येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे १४ वर्षांखालील अल्पवयीन मुलांकडूनच औषधे दिली जात असल्याचे प्रकार काही ठिकाणी दिसत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. औषध विक्रीसारख्या अत्यंत जबाबदारीच्या कामात प्रशिक्षित फार्मासिस्ट असणे बंधनकारक असताना अनुभव नसलेली मुले काउंटरवर बसून गोळ्या देत असतील, तर तो सरळसरळ रुग्णांच्या जीवाशी खेळ असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
या संपूर्ण प्रकारात मेडिकलधारकांची बेफिकिरी आणि नफेखोरी उघड होत आहे. नियमांचे पालन करण्याऐवजी “दुकान चालले की झाले” या मानसिकतेतून हा कारभार सुरू असल्याचे चित्र आहे. त्याहूनही मोठा सवाल म्हणजे वणीतील औषध विक्रेता संघटना नेमकी करते तरी काय? शहरात असे गंभीर प्रकार सुरू असताना संघटना मात्र गाढ झोपेत असल्याची टीका नागरिक करत आहेत.
याचबरोबर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ड्रग इन्स्पेक्टरवरही बोट ठेवले जात आहे. वणी शहरातील मेडिकल दुकानांची नियमित तपासणी करणे ही त्यांची जबाबदारी असताना प्रत्यक्षात मात्र या अनियमिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे “मेडिकलमध्ये अल्पवयीन मुलं औषध देतात आणि अधिकारी शांत बसतात” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता हा भोंगळ कारभार थांबवण्यासाठी प्रशासन जागे होणार का, आरोग्याशी चाललेला हा खेळ असाच सुरू राहणार, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
क्रमशः……

