Thursday, October 29, 2026
HomeBreaking"हास्याचा एक" जिवंत "श्रीकांत नावाचा झरा" हरपला.....

“हास्याचा एक” जिवंत “श्रीकांत नावाचा झरा” हरपला…..

Ajay,Wani:- आपल्या चेहऱ्यावरील हास्याने आणि शब्दांमधील मिश्किल विनोदाने इतरांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारे, दिवसभराचा ताण क्षणात हलका करणारे सर्वांचे लाडके ‘हसमुख काका’ म्हणजेच श्रीकांत किटकुले यांचे निधन झाल्याने वणीतील पत्रकार मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दैनिक लोकदूत प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेले श्रीकांत काका नेहमीप्रमाणे सकाळी वृत्तपत्र वाटपासाठी निघाले होते. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. वणी येथील जगन्नाथ मंदिराजवळ त्यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली कोसळले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचारांपूर्वीच काळाने घात केला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची जीवनयात्रा संपली.

श्रीकांत काका हे केवळ वृत्तपत्र प्रतिनिधी नव्हते, तर आपल्या माणुसकीने आणि विनोदी स्वभावाने प्रत्येकाच्या मनात आपलेपणाचे स्थान निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या बोलण्यातली गंमत, चेहऱ्यावरील प्रसन्नता आणि प्रत्येकाशी हसतखेळत संवाद साधण्याची त्यांची शैली यामुळे ते सर्वांचे लाडके बनले होते. स्वतःच्या कामात व्यस्त असतानाही इतरांचा ताण हलका करण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. आज त्यांचे हास्य कायमचे शांत झाले आहे. रोज सकाळी वृत्तपत्र घेऊन येणारा, भेटल्यावर एखादी मिश्किल टिप्पणी करून वातावरण हलके करणारा आपला माणूस आता पुन्हा दिसणार नाही, ही जाणीव मनाला अस्वस्थ करणारी आहे.

“काकांचं “कर्तव्याच्या वाटेवर अखेरचा श्वास…

वृत्तपत्र वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या आपल्या दैनंदिन कामासाठी घराबाहेर पडलेले श्रीकांत काका अखेर त्याच कर्तव्याच्या प्रवासात आपल्यातून निघून गेले. त्यांच्या जाण्याने केवळ एका वृत्तपत्र प्रतिनिधीची उणीव निर्माण झालेली नाही, तर मित्रपरिवारातील हास्याचा एक जिवंत झरा हरपला आहे. त्यांच्या आठवणी, त्यांचे विनोद आणि त्यांचा प्रेमळ स्वभाव कायम मनात जिवंत राहतील. हसमुख काका, तुम्ही आज आमच्यात नाहीत,पण तुमच्या हास्याच्या आठवणी आमच्या मनात सदैव राहतील. भावपूर्ण श्रद्धांजली….

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page