अजय, वणी : वणी तालुक्यातील राजूर येथील महावितरणच्या दोन सीनियर टेक्निशियनच्या कथित निष्काळजीपणाची अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेत त्यांना शोकॉज नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, केवळ नोटीस बजावून जबाबदारी संपत नाही.कर्तव्यात कसूर झाल्याचे निष्पन्न झाले आहे ,तर त्या कामचुकारांवर थेट निलंबनाची व्हायला पाहिजे अशी आक्रमक मागणी आता नागरिकांकडून होत आहे.
विशेषतः गावामध्ये स्पष्ट बोलल्या जात आहे की हे दोन्ही सिनेटिफिकेशन वेळेवर कोणीच येत नाही वेळ नऊ वाजताची आणि येतात एक वाजता असे देखील “पुरावे आणि व्हिडिओज” माध्यमात जवळ आलेले आहेत.निर्धारित वेळेत मुख्यालयात उपस्थित न राहणे, वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तातडीने प्रतिसाद न मिळणे आणि नागरिकांना तासन्तास अंधारात राहण्याची वेळ येणे, अशा तक्रारींमुळे महावितरणच्या स्थानिक कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित टेक्निशियन राजूरच्या मुख्यालयात उपस्थित राहण्याऐवजी वणीत राहतात, असाही आरोप होत असून, या बाबींची उपस्थिती नोंदी व अन्य अधिकृत कागदपत्रांच्या आधारे सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
शोकॉज नोटीस म्हणजे केवळ कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार ठरू नये.चौकशीमध्ये कर्तव्यात कसूर, मुख्यालयातील अनुपस्थिती किंवा नियमांचे उल्लंघन सिद्ध झाल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर शिस्तभंगाची कारवाई करून निलंबनाचा निर्णय घ्यावा, अशी नागरिकांची ठाम भूमिका आहे. सरकारी पगार घेऊनही जनतेच्या वीजसमस्यांकडे दुर्लक्ष होत असेल, तर अशा कारभाराला वरिष्ठ अधिकारी किती दिवस पाठीशी घालणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. राजूरच्या नागरिकांना अखंडित वीजपुरवठा आणि तातडीची सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे; त्यामुळे केवळ नोटीस देऊन प्रकरण गुंडाळण्याऐवजी चौकशीचा निष्कर्ष आणि त्यानुसार झालेली कारवाई जनतेसमोर यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आता महावितरणचे वरिष्ठ अधिकारी केवळ नोटिशीवर थांबणार की प्रत्यक्ष शिस्तीचा बडगा उगारणार, याकडे राजूरवासीयांचे लक्ष लागले आहे.

