Wednesday, April 15, 2026
Homeयवतमाळसंतांच्या उपदेशातूनच जीवन सुंदर 

संतांच्या उपदेशातूनच जीवन सुंदर 

Wani:- संत महापुरुषांच्या विचारांचा अंगीकार केल्यास मानवी जीवन सुंदर, सुसंस्कृत आणि अर्थपूर्ण होऊ शकते, असे प्रतिपादन श्री गुरुदेव सेनेचे अध्यक्ष दिलीप भोयर यांनी केले. ते मंदर येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.वणी तालुक्यातील मंदर येथे संत तुकडोजी महाराज यांच्या ११७ व्या जयंतीनिमित्त तसेच संत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. श्रीराम जन्मोत्सवाचे औचित्य साधून २५ व २६ मार्च रोजी आयोजित या कार्यक्रमांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाची सुरुवात २५ मार्च रोजी सायंकाळी घटस्थापनेने झाली. त्यानंतर सामुदायिक प्रार्थना व मार्गदर्शन सत्र पार पडले. सायंकाळी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, मुर्धोणी यांच्या वतीने भव्य भजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला.२६ मार्च रोजी पहाटे स्वच्छता अभियान राबवून दिवसाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सामूहिक ध्यान घेण्यात आले. सकाळी विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकासह हरिपाठ, पालखी व दिंडीच्या माध्यमातून गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत विविध भजन मंडळे, महिला बचत गट, शिवभक्त मंडळ, शिवनेरी क्रीडा मंडळ तसेच विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान समितीचा उत्स्फूर्त सहभाग होता.

दुपारी आयोजित कार्यकर्ता मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अनंतलाल चौधरी होते, तर उद्घाटन संजय खाडे यांच्या हस्ते झाले. प्रमुख मार्गदर्शक दिलीप भोयर यांनी संतांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत नैतिक मूल्ये जोपासण्याचे आवाहन केले. त्यांनी व्यसनमुक्ती, सामाजिक एकता आणि आत्मविकास यांवर विशेष भर दिला.यावेळी सरपंच वर्षा बोढे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारत कारडे यांनी केले, सूत्रसंचालन प्रवीण ठेंगणे यांनी तर आभार प्रदर्शन राहुल मेश्राम यांनी केले.कार्यक्रमाचा समारोप वसंतराव देठे महाराज यांच्या कीर्तनाने झाला. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजक राजूभाऊ ठमके व सहसंयोजक विजय परसुटकर, गणेश खरवडे, अमोल जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page