Friday, May 15, 2026
HomeBreakingवणी ठाणेदाराची "डमरूसारखी" फिरवाफिरवी.....

वणी ठाणेदाराची “डमरूसारखी” फिरवाफिरवी…..

Ajay Kandewar,Wani : बनावट दस्तऐवज तयार करून प्लॉट विक्री, महसूल विभागातील शासकीय नोंदींमध्ये फेरफार आणि आर्थिक फसवणूक केल्याच्या गंभीर प्रकरणात अखेर वणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र हा गुन्हा सहजासहजी दाखल झाला नसून, पत्रकारांनी थेट ठाणेदाराच्या केबिनसमोर ठिय्या आंदोलन करत पोलिसांना धारेवर धरल्यानंतरच कारवाईला गती मिळाली. जवळपास तीन ते चार तास चाललेल्या या ठिय्या आंदोलनामुळे पोलीस स्टेशन परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

तक्रारदार पत्रकार सूरज चाटे (रा.वणी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी संगनमताने खोटे दस्तऐवज तयार करून प्लॉटची खरेदी-विक्री केली तसेच महसूल विभागातील नोंदींमध्ये फेरफार करून लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात शैलेश दादाजी वाकडे (रा. बाबूपेठ, चंद्रपूर), अर्जनवीस सतीश पुंडलिकराव केराम (रा. ओमनगर, चिखलगाव), तत्कालीन तलाठी रविंद्र निळकंठ उपरे आणि मंडळ अधिकारी राजू निळकंठ डोंगरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून सुरुवातीला टाळाटाळ होत असल्याचे ठाणेदाराचे विदारक चित्र पाहून वणी पत्रकारांनी थेट ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या केबिनसमोर 3 तास ठिय्या आंदोलन छेडत “प्रशासकीय अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे का?” असा थेट सवाल उपस्थित केला. “ वणी ठाणेदार हा पत्रकारांना डमरूसारखा इकडे-तिकडे फिरवत होता. प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे देऊन गुन्हा नोंदविणे टाळले जात होते,” असा आरोप पत्रकारांनी केला. वणी ठाण्यात पत्रकारांचा आक्रोश पाहून माजी आमदार बोधकुरवार व विद्यमान आमदार संजय देवकर यांनी तातडीने ठाण्यात धाव घेतली.यावेळी त्यांनी ठाणेदार गोपाल उंबरकर यांना खडे बोल सुनावत पत्रकारांवरील कारवाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.घटनेशी संबंधित अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करत त्यांनी प्रशासनाला जाब विचारला. पत्रकारांच्या भावना आणि संताप लक्षात घेत निष्पक्ष चौकशीची मागणीही यावेळी करण्यात आली.अखेर वाढता दबाव, वरिष्ठांचे आदेश आणि पत्रकारांच्या आक्रमक भूमिकेनंतर पोलिसांनी FIR दाखल केली. आता या प्रकरणात आणखी कोणाचे नाव समोर येते आणि तपास कितपत निष्पक्ष होतो ,याकडे सर्वांचे लक्ष लागले.

सदर आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 318(4), 336(3), 340(2) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 318(4) अंतर्गत आर्थिक फसवणूक व विश्वासघात, कलम 336(3) अंतर्गत खोटे दस्तऐवज तयार करणे व शासकीय नोंदींमध्ये फेरफार, कलम 340(2) अंतर्गत बनावट कागदपत्रांचा वापर करून फसवणूक करणे तर कलम 3(5) अंतर्गत सामूहिक संगनमताने गुन्हा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या सर्व कलमांमुळे प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले असून महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page