Ajay, Wani : वणी–आदिलाबाद मार्गावर धावणाऱ्या एसटी बससेवेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. MH-14-BT-4317 क्रमांकाच्या बसला चक्क मुख्य रस्त्यावर धक्का मारण्याची वेळ आल्याची घटना नेरड मार्गावर समोर आली.
प्रवाशांनी आपल्या गंतव्यस्थळी सुरक्षित पोहोचण्यासाठी पैसे मोजून तिकीट घेतले असताना, उलट बंद पडलेल्या बसला धक्का देण्याची वेळ येत असेल तर एसटीच्या देखभाल-दुरुस्ती व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बसमध्ये बिघाड झाल्यानंतर प्रवाशांना वेळेवर पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणे, वाहनांची नियमित तपासणी करणे आणि सुरक्षित प्रवासाची हमी देणे ही परिवहन व्यवस्थेची मूलभूत जबाबदारी असताना प्रत्यक्षात प्रवाशांच्या माथी गैरसोयीचे संकट लादले जात असल्याचे चित्र आहे.
शासनाकडून प्रवाशांना विविध सवलती, सुरक्षित व नियमित प्रवासाची सुविधा आणि सार्वजनिक वाहतुकीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले जाते. मात्र, बस बंद पडणे, प्रवाशांचा खोळंबा होणे आणि अखेर प्रवाशांनीच बसला धक्का मारणे अशी परिस्थिती निर्माण होत असेल, तर या सुविधांचा नेमका लाभ कोणाला मिळतो, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित होत आहे. परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच कोमात असलेला वणी आगार प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन बसची तांत्रिक स्थिती, नियमित देखभाल आणि मार्गावरील बससेवेची गुणवत्ता तपासावी, अशी मागणी होत आहे. ‘लालपरी’ ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असताना धक्क्याचा आधार घ्यावा लागणे, हा एसटीच्या कारभारासाठी धोक्याचा इशारा मानला जात आहे.

