Tuesday, July 28, 2026
HomeBreakingवणीत ‘आजी-आजोबा ओपीडी’ची अनोखी सुरुवात...

वणीत ‘आजी-आजोबा ओपीडी’ची अनोखी सुरुवात…

Ajay Kandewar,वणी : शहरात आरोग्यसेवा दिवसेंदिवस महाग होत असताना ज्येष्ठ नागरिकांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार उपचार मिळावेत, या उदात्त भावनेतून वणी शहरातील सरस्वती हॉस्पिटलतर्फे येत्या १ तारखेपासून ‘आजी-आजोबा ओपीडी’ हा अभिनव उपक्रम सुरू होत आहे. या उपक्रमाअंतर्गत ज्येष्ठ महिला व पुरुषांची तपासणी केवळ ५० रुपयांत केली जाणार असून, आवश्यक उपचार व पुढील वैद्यकीय मार्गदर्शनही दिले जाणार आहे. शनिवार वगळता दररोज सकाळी ९ ते ११( रविवार ते शुक्रवार) या वेळेत ही सेवा उपलब्ध राहणार असून, वाढत्या वयातील आजार वेळेत ओळखून त्यावर योग्य उपचार मिळावेत, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. समाजातील ज्येष्ठांना सन्मानाने, आत्मीयतेने आणि माफक शुल्कात आरोग्यसेवा मिळावी, यासाठी हा उपक्रम वणीकरांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

या उपक्रमाला भावनिक स्पर्शही लाभला आहे. दिवंगत वडील संभाजी लिमजे आणि आई अनुसया लिमजे यांनी दिलेले मानवतेचे संस्कार जपत समाजाप्रती असलेले ऋण फेडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असल्याची भावना डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. आजच्या काळात उपचारांचा खर्च अनेक कुटुंबांसाठी चिंतेचा विषय बनला असताना, आर्थिक अडचणीमुळे एकाही ज्येष्ठाचा उपचार थांबू नये, ही संवेदनशील जाणीव मनात ठेवून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे ‘आजी-आजोबा ओपीडी’ ही केवळ वैद्यकीय सेवा नसून, ज्येष्ठांविषयीची कृतज्ञता आणि माणुसकी जपणारा सामाजिक उपक्रम म्हणून पाहिला जात आहे.

डॉ. लिमजे यांच्या मनातील भावना या उपक्रमातून स्पष्टपणे उमटतात. वणी शहरात वैद्यकीय सेवा सुरू केली, त्या सुरुवातीच्या काळात रुग्णांकडून अवघे ५० रुपये तपासणी शुल्क घेतले जात होते. त्या काळातील लोकांचा विश्वास, प्रेम आणि आपुलकी आजही त्यांनी मनात जपून ठेवली आहे. काळ बदलला, वैद्यकीय क्षेत्र आधुनिक झाले, सुविधा वाढल्या; मात्र समाजसेवेची तीच भावना कायम ठेवत साई मंदिर चौक, यवतमाळ रोड येथे उभारलेल्या नव्या ‘सरस्वती हॉस्पिटल’मधून पुन्हा एकदा ५० रुपयांत ‘आजी-आजोबा ओपीडी’ सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. ही केवळ शुल्काची घोषणा नसून, वणीकरांनी वर्षानुवर्षे दिलेल्या विश्वासाला दिलेले भावनिक उत्तर आहे. त्यामुळे येत्या १ तारखेपासून सुरू होणारा हा उपक्रम वणी शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्यसेवेची नवी आशा आणि डॉ. लिमजे यांच्या समाजाभिमुख विचारांचा प्रेरणादायी आदर्श ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page