Saturday, May 30, 2026
HomeBreakingवणीत "अक्षय बोढे" रक्तबंबाळ.......

वणीत “अक्षय बोढे” रक्तबंबाळ…….

Ajay Kandewar, वणी : शहरातील शास्त्रीनगर परिसर गुरुवारी मध्यरात्री अक्षरशः रक्ताने माखला. पत्नीला मानसिक व शारीरिक त्रास दिल्याच्या आरोपातून संतप्त झालेल्या मेव्हण्याने आपल्या चार साथीदारांसह तरुणाच्या घरात घुसून धारदार शस्त्राने थरारक हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या भीषण हल्ल्यात युवकासह त्याचे काका आणि काकू गंभीर जखमी झाले असून तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शास्त्रीनगर येथे राहणारा अक्षय बोढे (२८) याचा विवाह चंद्रपूर येथील एका तरुणीसोबत झाला होता. विवाहानंतर काही दिवसांतच पतीकडून छळ होत असल्याच्या तक्रारी पत्नी सातत्याने माहेरी करत होती. बहिणीवर होत असलेल्या कथित अत्याचारामुळे तिचा भाऊ अमन रामानंद घागी (२८) संतप्त झाला होता.गुरुवारी रात्री अमन घागी हा चार साथीदारांसह थेट अक्षयच्या घरी पोहोचला. त्यावेळी अक्षय घरात नसल्याने पत्नीनेच त्याला फोन करून घरी बोलावल्याची माहिती समोर आली आहे. अक्षय घरी येताच पत्नीला त्रास देण्याच्या कारणावरून दोन्ही बाजूंमध्ये जोरदार वाद सुरू झाला. काही क्षणांतच हा वाद हिंसक व रक्तरंजित स्वरूपात बदलला.आरोपी अमनने सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने अक्षयवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. मानेवर आणि शरीराच्या विविध भागांवर गंभीर वार झाल्याने अक्षय रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. पुतण्याला वाचवण्यासाठी धावलेल्या त्याच्या काका आणि काकूंवरही आरोपींनी निर्दयीपणे हल्ला चढवला. तिघेही गंभीर जखमी अवस्थेत रक्तबंबाळ होऊन जमिनीवर पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

मध्यरात्रीच्या या थरारक घटनेमुळे शास्त्रीनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी आरडाओरड ऐकताच मोठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना प्रथम स्थानिक रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिघांनाही पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. अक्षय बोढे याची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती समोर येत आहे.दरम्यान, मुख्य आरोपी अमन घागी याच्यासह एका महिलेला ताब्यात घेतले आहे. तर इतर साथीदार फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.या प्रकरणी युवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गंभीर स्वरूपाचे BNS कलम 109(1), 189(2), 190, 191, 2/3 अंतर्गत वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास PSI सुयोग महापुरे करीतआहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page