Monday, November 16, 2026
HomeBreakingत्या....ठेकेदाराच्या गाडीवर आमदारांचा शिक्का; अमृत योजनेचा ठेकेदार की स्वयंघोषित आमदार?

त्या….ठेकेदाराच्या गाडीवर आमदारांचा शिक्का; अमृत योजनेचा ठेकेदार की स्वयंघोषित आमदार?

Ajay Kandewar,Wani : शहरात अमृत योजनेचे काम करणाऱ्या एका ठेकेदाराच्या वाहनावर चक्क आमदारांचे पदनाम आणि शिक्का वापरल्याची बाब चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे या वाहनाची नोंदणी ठेकेदाराच्याच नावावर असल्याची माहिती समोर येत असून, वाहनाच्या PUC प्रमाणपत्राची मुदतही संपल्याचे निदर्शनास आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठेकेदाराने हे वाहन नगरपरिषदेच्या आवारात आणले होते. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराने आता वेगळेच वळण घेतले आहे.

अमृत योजनेचे काम करणारा ठेकेदार नेमका ठेकेदार म्हणून काम करतोय की आमदारांचा शिक्का वापरून स्वतःच लोकप्रतिनिधी असल्याचा प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, असा सवाल उपस्थित होत आहे. वाहन स्वतःच्या नावावर असताना त्यावर आमदारांचे पदनाम किंवा शिक्का वापरण्याची गरज काय? हा केवळ दिखावा आहे की प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव निर्माण करण्याची रणनीती, अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे.

विशेष म्हणजे अमृत योजनेचे काम हे शासकीय यंत्रणेच्या देखरेखीखाली सुरू असताना संबंधित ठेकेदाराच्या वाहनावर अशा प्रकारचे पदनाम झळकणे कितपत योग्य आहे? अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये प्रभाव निर्माण करण्यासाठी अशा चिन्हांचा वापर केला जात आहे का? याची चौकशी होणे गरजेचे आहे. पदाचा शिक्का वापरून प्रशासनात वेगळेच वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल, तर हा प्रकार निश्चितच गंभीर आहे.

PUC संपले, पण पदनामाचा रुबाब कायम….

एका बाजूला सामान्य वाहनधारकांना PUC प्रमाणपत्रासाठी नियमांचे पालन करावे लागते, तर दुसऱ्या बाजूला ठेकेदाराच्या वाहनावर PUC कालबाह्य असल्याची बाब समोर येत असताना त्यावर आमदारांचे पदनाम झळकत असल्याची चर्चा आहे. नियमांचे पालन करण्याऐवजी पदनामाच्या प्रभावावर अवलंबून राहण्याचा प्रयत्न तर नाही ना?आता नगरपरिषद प्रशासन आणि परिवहन विभाग या प्रकरणाची दखल घेणार का? वाहनावर वापरण्यात आलेल्या आमदारांच्या शिक्क्याची अधिकृतता तपासली जाणार का? तसेच PUC संपलेल्या वाहनावर नियमानुसार कारवाई होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.अमृत योजनेचा ठेकेदार असताना आमदारांचा शिक्का वापरण्याची गरज काय? ठेकेदाराच्या गाडीवर आमदारांचा शिक्का झळकत असेल, तर शहरात ‘ठेकेदारच आमदार बनलाय की काय?’ अशी चर्चा होणे स्वाभाविक आहे. आता प्रशासन या प्रकारावर काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page