Ajay , Wani : शिवसेना नेते तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त यवतमाळ जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या पुढाकारातून व लता मंगेशकर हॉस्पिटल, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले भव्य मोफत आरोग्य शिबिर सोमवारी जैताई मंदिर परिसरात यशस्वीरित्या संपन्न झाले. 
सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत झालेल्या या शिबिराला वणी, मारेगाव, झरी तसेच परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिरात ५४५ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ९३ रुग्णांना नेत्र शस्त्रक्रियेसाठी पुढील उपचाराकरिता संदर्भित करण्यात आले.जनसामान्यांना दर्जेदार आरोग्यसेवा सहज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात आले.या शिबिरामध्ये जनरल फिजिशियन, शस्त्रक्रिया, बालरोग, नेत्ररोग, कान-नाक-घसा, अस्थिरोग, स्त्रीरोग व त्वचारोग तज्ज्ञांनी रुग्णांची मोफत तपासणी केली. गरजू रुग्णांना मोफत औषधांचे वाटप, आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन देण्यात आले. तसेच नेत्र तपासणीनंतर पात्र लाभार्थ्यांना मोफत चष्मे देण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. विशेष म्हणजे, तपासणीदरम्यान नेत्र शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या ९३ रुग्णांची निवड करून त्यांना पुढील शस्त्रक्रियेसाठी पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी शिबिर यशस्वीपणे पार पाडणाऱ्या लता मंगेशकर हॉस्पिटल, नागपूरच्या डॉक्टर व वैद्यकीय पथकाचा यवतमाळ जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या यशस्वी उपक्रमासाठी शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी जिल्हा संघटक विजय चोरडिया, सुधाकर गोरे, दीपक कोकास, आशिष खुळसंगे, विनोद मोहितकर, किशोर नांदेकर, उमेश वैरागडे, शुभम गोरे, बाळू चेडे, विशाल किन्हेकर, प्रसाद ठाकरे, हिमांशू बोहरा, राहुल पारखी, संगीता मुरस्कर, मनीषा कोंगरे, वसुधा ढगे, भाग्यश्री वैद्य, प्रणोती बांगडे व सौ. पुरी यांच्यासह शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध व्यवस्था सांभाळत शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

