Ajay Kandewar | Wani :- नववर्षाच्या दिवशीच दि. १ जानेवारी २०२६ रोजी वणी तालुक्यातील चिखलगाव ग्रामपंचायत राजकीय खेळीने हादरली. विकासाचे गाजर दाखवून मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या सत्ताधाऱ्यांविरोधात तब्बल आठ ग्रामपंचायत सदस्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली होती.मात्र हे प्रकरण इथेच थांबलेले नसून, या राजीनाम्यांना आता नाट्यमय वळण मिळाले आहे. ग्रामपंचायतीतील आणखी दोन ते तीन सदस्य हे राजीनामा दिलेल्या आठ सदस्यांच्या थेट संपर्कात असल्याची माहिती समोर येत असून, त्यामुळे आता सरपंच आणि उपसरपंच यांची खुर्ची अक्षरशः डळमळीत झाली आहे.
चिखलगाव ग्रामपंचायत ही एकूण १७ सदस्यांची आहे. त्यापैकी ८ सदस्यांनी आधीच राजीनामे दिले असून, आता आणखी दोन सदस्य वेगळ्या भूमिकेत जाण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. ही संख्या वाढल्यास सत्ताधाऱ्यांचे बहुमत कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांचा मनमानी कारभार विकासकामांना पूर्णतः ब्रेक दिल्याने गावाच्या विकासासाठी निवडून आलेले पदाधिकारीच जर सदस्यांना डावलून, नियमांना हरताळ फासून कारभार करत असतील, तर ही केवळ प्रशासकीय अपयश नाही, तर लोकशाहीवरचा थेट आघात आहे, असा रोष राजीनामा दिलेल्या सदस्यांमध्ये दिसून येतो.राजीनामे वैध ठरल्यास सरपंच–उपसरपंच पदावर कायदेशीर कारवाई व विश्वासदर्शक ठराव येण्याची दाट शक्यता आहे.
•खुर्चीचा “माज” किती दिवस हो साहेब.?
“राजकारणात घंटा वाजते तेव्हा ती वेळ संपत असल्याचा इशारा असतो, आणि चिखलगावमध्ये ही घंटा आता जोरात वाजू लागली आहे. खुर्चीवर बसून ताकद दाखवता येते, पण विश्वास गमावल्यावर तीच खुर्ची ओझं बनते, हे सरपंच व उपसरपंच विसरत असल्याचे दिसते. आज परिस्थिती अशी आहे की सत्तेची खुर्ची टिकेल की नाही, हा प्रश्न अधिक ठळकपणे उपस्थित होत आहे.”

